आजोबा, आम्हाला टेस्ला कार नको; शाळेत जायला एसटी बस पास मोफत करा”–छात्र भारतीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी...


 आजोबा, आम्हाला टेस्ला कार नको; शाळेत जायला एसटी बस पास मोफत करा”–छात्र भारतीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:

महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत एसटी बस पास देण्याची मागणी करत छात्र भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. “आजोबा, आम्हाला टेस्ला कार नको; शाळेत जायला एसटी बस पास मोफत करा,” अशी भावनिक आणि थेट मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली.छात्र भारतीचे राज्याध्यक्ष अनिकेत घुले, बुलढाणा जिल्हाध्यक्ष ओम तांगडे आणि जिल्हा कार्याध्यक्ष आकाश गवई यांनी परिवहन मंत्र्यांना निवेदन देत राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोफत एसटी पास देण्याची मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरक्षित आणि सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.निवेदनात चोपडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना पास नसल्याने एसटी बसमधून उतरवण्यात आल्याची घटना नमूद करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या घटना राज्यभर घडत असून अनेक विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेने सांगितले.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज प्रवास करावा लागतो. वाढत्या खर्चामुळे अनेक विद्यार्थ्यांना एसटी प्रवास परवडत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सन्मानाने शिक्षण घेता यावे आणि कोणालाही आर्थिक कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा छात्र भारतीने व्यक्त केली आहे. संघटनेने राज्यभरातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांच्या समर्थनासह ही मागणी शासनापुढे मांडल्याचे सांगितले.तुम्ही केलेली मागणी अतिशय योग्य आहे, तुमच्या मागणीचा विचार केला जाईल असे तोंडी आश्वासन परिवहन मंत्र्यांनी यावेळी दिले.

Previous Post Next Post