जळगाव जामोद (प्रतिनिधी):
जळगाव जामोद शहरातून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात जळगाव जामोद पोलिसांना मोठं यश आले आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी थेट देशाची राजधानी दिल्ली गाठून मुलीची सुटका केली असून, तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.फिर्यादी ज्योती मिरगे (वय ३९, रा. चावरा) यांची मुलगी शिक्षणासाठी आपल्या आजोबांकडे वडशिंगी येथे राहत होती. ९ मार्च २०२६ रोजी तिचा जळगाव जामोद येथे इतिहास विषयाचा पेपर असल्याने ती घरातून निघाली, मात्र सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. शोधाशोध केल्यानंतरही ती मिळून न आल्याने, अज्ञात इसमाने तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.याप्रकरणी १० मार्च रोजी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात अप क्रमांक १९३/२०२६ कलम १३७(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी हेडकॉन्स्टेबल भागवत उंबरहंडे यांनी तांत्रिक विश्लेषण विभागाची मदत घेतली.तपासादरम्यान सदर मुलगी दिल्ली येथे असल्याचे निष्पन्न झाले.मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, १७ मार्च रोजी पोलीस पथक दिल्लीकडे रवाना झाले.यामध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल भागवत उंबरहंडे,पोलीस कॉन्स्टेबल गणेश हाडे,पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपुत हे पथक दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला. यावेळी आरोपी सुपडा चंद्रमोहन लादे (रा.चावरा) हा पीडित अल्पवयीन मुलीसह बॅगा भरून सिमला येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी योग्य वेळी झडप घालून दोघांनाही ताब्यात घेतले आणि आरोपीचा सिमला पळून जाण्याचा डाव उधळून लावला.पोलिसांनी आरोपी सुपडा लादे आणि पीडित तरुणीला जळगाव जामोद येथे आणले.आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करण्यात आली आहे, तर अल्पवयीन मुलीला सुरक्षितपणे तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या यशस्वी आणि धडाकेबाज कारवाईमुळे पीडित कुटुंबाने पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल भागवत उंबरहंडे आणि गणेश हाडे करीत आहेत.
