जळगाव जामोद (प्रतिनिधी):
जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या एका मोठ्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.आसलगाव-सावरगाव रस्त्यावरील पंपहाऊसच्या बांधकाम साईटवरून सिमेंटच्या गोण्या चोरणाऱ्या कुरणगाड खुर्द येथील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फिर्यादी संकेत रंगराव देशमुख (वय ३५ वर्ष, रा. खेर्डा खुर्द, ता. जळगाव जामोद) हे व्यवसायाने कंत्राटदार असून, सावरगाव शिवारात त्यांचे पंपहाऊसचे बांधकाम सुरू आहे. दिनांक ४ मार्चच्या संध्याकाळी ७ वाजेपासून ते ५ मार्चच्या सकाळी ९ वाजेच्या सुमारास, अज्ञात चोरट्यांनी या बांधकाम साईटवरून अल्ट्राटेक कंपनीच्या ८० सिमेंट बॅग चोरून नेल्या होत्या. एका गोणीची किंमत ३८० रुपये प्रमाणे एकूण ३०,४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक १९५/२०२६, कलम ३०३(२), ३(५) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. १० मार्च रोजी दुपारी ३:४६ वाजता या गुन्ह्याची अधिकृत नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक माहिती आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले.यामध्ये १. शंकर नारायण राठोड (वय ४७ वर्ष)२. मधुकर नारायण राठोड (वय ४५ वर्ष)३. नागोराव नयनसिंग राठोड (वय ४४ वर्ष)सर्व राहणार कुरणगाड खुर्द, ता. जळगाव जामोद या तिघांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना १० मार्च २०२६ रोजी रात्री १०:११ वाजता रीतसर अटक करण्यात आली. अटकेची माहिती त्यांचे भाऊ संतोष नारायण राठोड यांना देण्यात आली असून, सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहेत.ही यशस्वी कारवाई ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार व त्यांच्या पथकाने पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय नागेश खाडे आणि हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार करत आहेत.या धडक कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला असून, बांधकाम साहित्याच्या चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
