रस्ता रुंदीकरणात पाईपलाईन उद्ध्वस्त; ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती, प्रशासनाचे 'हात वर


 रस्ता रुंदीकरणात पाईपलाईन उद्ध्वस्त; ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती, प्रशासनाचे 'हात वर'

जळगांव जामोद (प्रतिनिधी):

विकासकामे होत असताना नियोजनाचा अभाव असल्यास सर्वसामान्यांना कशा यातना सोसाव्या लागतात, याचा प्रत्यय सध्या जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे येत आहे. जळगाव ते जामोद या रस्त्याचे काम जोमात सुरू असताना, चुकीच्या नियोजनामुळे गावाचा पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन उखडून टाकण्यात आली आहे. परिणामी, गेल्या १० दिवसांपासून अर्धे गाव पाण्याविना असून, ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाण्यासाठी दारोदार भटकंती करावी लागत आहे.​काही काळापूर्वी 'महाजल योजने'अंतर्गत गावात पाईपलाईन टाकण्यात आली होती. मात्र, त्यावेळी भविष्यातील रस्ता रुंदीकरणाचा कोणताही विचार न करता, डांबरी रस्त्याच्या अगदी कडेला ही लाईन टाकली गेली. आता जळगाव-जामोद रस्त्याचे मजबुतीकरण आणि रुंदीकरण सुरू असताना, जेसीबीने रस्ता खोदताना ही मुख्य पाईपलाईन फुटली आणि रस्त्यातून काढून टाकण्यात आली. यामुळे ग्रामपंचायत कार्यालयापासून ते थेट बसस्थानक परिसर आणि समोरील संपूर्ण वस्तीचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.​ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर सुनगावात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना, ग्रामपंचायत प्रशासनाने यावर तोडगा काढण्याऐवजी चक्क 'हात वर' केले आहेत. "आम्ही काय करणार?" अशी भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील महिलांना आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत असून, गरिबांचे मोठे हाल होत आहेत.​एकीकडे सरकार 'हर घर नल, हर घर जल'च्या घोषणा देत असताना, सुनगावात मात्र असलेल्या पाईपलाईनची विल्हेवाट लागली आहे. ग्रामपंचायतीच्या सुस्त कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता थेट गटविकास अधिकारी (BDO) यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने पर्यायी व्यवस्था करावी किंवा पाईपलाईन दुरुस्त करून पाणी प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.

_______________________

"१० दिवसांपासून थेंबभर पाणी नाही. रस्ता होतोय हे चांगलं आहे, पण प्रशासनाने आधी पाईपलाईनची सोय करायला हवी होती. आता पाणी विकत घ्यावे लागत आहे, हे आमचे दुर्दैव आहे."

— एक त्रस्त ग्रामस्थ

Previous Post Next Post