कारंजा आणि मानोरा तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.


 विश्वास कुटे वाशिम जिल्हा प्रतिनिधी...

वण्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले हे नुकसान थांबविण्यासाठी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व झालेल्या पीक नुकसानीची भरपाई देण्याच्या मागणीसाठी समनक जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दि. 9 ऑक्टोंबर रोजी कारंजा येथिल झाशी राणी चौक बायपास येथे तासभर रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी प्रचंड घोषणाबाजी करुन नाकर्ते सरकार आणि वनविभागास धारेवर धरले. यावेळी वनविभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना भेट देऊन मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनास पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.कारंजा आणि मानोरा तालुक्यात बहुतांश वनक्षेत्र असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे. शेतीचे मोठे प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांकडून वारंवार तक्रार केली जात आहे. मात्र, याबाबत कुठेही दखल घेतली जात नाही.शेतकऱ्यांच्या या मागण्यांसाठी समनक जनता पार्टीने वनविभागास निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या माध्यमातून वन्य प्राण्यांमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई त्वरित मिळावी, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांच्या जीवांचे व पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याबाबत उपाययोजना कराव्या , शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी उपायोजना राबवावी. वनविभाग व वन्यजीव वनपरिक्षेत्राकडून जोपर्यंत वनपरिक्षेत्रात पक्के कुंपण होत नाही तोपर्यंत प्राण्यांमुळे होणारी शेतकऱ्यांची जीवितहाणी तसेच नुकसानीची भरपाई सरसकट देण्यात यावी. आदी प्रमुख मागण्यांसह विविध मागण्या साठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या या मागण्यांसाठी समनक जनता पार्टीने आधीच आंदोलन जाहीर केल्यामुळे कारंजा व मानोरा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी सकाळी साडेअकरा वाजता बायपास परिसरात रस्ता रोखून धरला. आणि जय मानवता, जय संविधान हा पक्षाचा नारा देऊन वनविभाग व शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तब्बल तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे बायपास परिसरात असलेल्या सर्व रस्त्यांवर शेकडो वाहने थांबली होती. समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, राष्ट्रीय नेते प्रा. डॉ. अनिल राठोड, जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांच्या मार्गदर्शनात कारंजा - मानोरा विधानसभा अध्यक्ष प्रकाश बळीराम राठोड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. अनिल राठोड, जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, महिला जिल्हाध्यक्ष शितल राठोड, कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी आक्रमक स्वरूपात भाषण करून शेतकऱ्यांच्या मागण्या उजागर केल्या. यावेळी वनविभाग प्रादेशिक वाशिम चे सहाय्यक वनसंरक्षक ( रोहयो ) छत्रपती चव्हाण यांनी आंदोलनास भेट देऊन मागण्यांचे निवेदन स्विकारले आणि पूर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. या आंदोलनासाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता. या आंदोलनाला गोरसेना, धनगर समाज युवा मल्हार सेना, शेतकरी संघटनेचे गजानन अहमदाबादकर यांनी पाठिंबा दिला. या आंदोलनासाठी राजेश राजेश मोटे, प्रकाश राठोड, प्रमिला आडे, शर्मिला राठोड, मंगरूळपीर महिला तालुकाध्यक्ष नीता चव्हाण, कल्पना राठोड, लता राठोड, आदीसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते

Previous Post Next Post