जळगाव जामोद(प्रतिनिधी):
जळगाव जामोद तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद अंतर्गत महासिद्ध महाराज संस्थान सभागृह धानोरा येथे दिनांक 3 जून 2026 रोजी खासगी सहकारी भागीदारी उपक्रम अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बुलढाणा व कृपामयी ग्रुप हिंगणे बु. ता.जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मका तूर् कापूस पिकांचे व्यवस्थापन व नैसर्गिक शेती काळाची गरज कार्यशाळेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून संतोष डाबरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा बुलढाणा यांच्या मार्गदनाखाली पार पडला.तसेच तज्ञ म्हणून लाभलेले डॉ.बी डी.जडे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ जैन इरिगेशन सिस्टीम लि. यांनी शेतकऱ्यांना कापूस तूर आणि मका लागवडीचे प्रगत तंत्रज्ञान सांगून शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडली. तसेच त्यांनी स्वतःचे अनुभव शेतकऱ्यांना सांगू शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविला. तसेच अनिल चौधरी व्यवस्थापक कृपा मयी ग्रुप हिंगणे बु.तालुका जामनेर यांनी शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान व भाजीपाला रोपवाटिका बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आनंद खंडेलवाल विभागीय व्यवस्थापन जैन इरिगेशन सिस्टीम लि. अमरावती विभाग यांनी शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन व्यवस्थापन व त्याचे होणारे फायदे याबाबत सखोल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पद्माकर चिंचोले व्यवस्थापक मधुर प्युअर लाईन जामनेर यांनी नैसर्गिक शेती बाबत महत्त्व सांगून नैसर्गिक शेती करणे ही काळाची गरज आहे या बाबत शेतकऱ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. तदनंतर रमेश जाधव तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना बाबत तसेच सरी वरंबा पद्धतीचा अवलंब, सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, आदर्श बाजार व्यवस्था, शेतमाला वरील विपणन व्यवस्थापन याबाबत मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.अशा प्रकारे वरिष्ठ तज्ञ यांचे मार्गदर्शक धानोरा महासिद्ध येथील समस्त ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना लाभले . सदर कार्यक्रमास धानोरा महासिद्ध येथील सरपंच विठ्ठल रामेश्वर पैसोडे, संदीप भोपळे तसेच पोलीस पाटील संगोपाल नारायण अवचार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बचत गटाच्या महिला वर्ग व शेतकरी पुरुषवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर राऊत यांनी केले. सदर कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी एस.टी सुरडकर, उप कृषी अधिकारी डी.जे. शेकोकार, दांदळे, कु. एन. ए. उरकडे व सहाय्यक कृषी अधिकारी यु.पी. वाघ व कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी कृषी सेवक सदर कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका कृषी अधिकारी आर. एन.जाधव यांनी केले. धानोरा महासिद्ध येथील सर्व गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
