खेर्डा बु. येथे 'कृषी तंत्रज्ञानाचा जागर' कार्यशाळा उत्साहात संपन्न..


 खेर्डा बु. येथे 'कृषी तंत्रज्ञानाचा जागर' कार्यशाळा उत्साहात संपन्न..

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

कृषी विभाग महाराष्ट्र शासन ,आत्मा बुलढाणा व कृपामयी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कृषी तंत्रज्ञानाचा जागर - खरीप हंगाम मोहीम 2026' ही कार्यशाळा आज शंकर महाराज संस्थान, खेर्डा बु. येथे मोठ्या उत्साहात पार पडली.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक, आत्मा बुलढाणा संतोष डाबरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम राबविण्यात आला .या कार्यक्रमाला खेर्डा बु व खेर्डा खुर्द मधील  शेतकरी, महिला शेतकरी व युवक उपस्थित होते. कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, कृपामयी ग्रुपचे अनिल चौधरी, जैन इरिगेशनचे डॉ. बी. डी. जडे व आनंद खंडेतवाल, मयूर लाईव्हचे पद्माकरभाऊ चिंचोले आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. बी. डी. जडे यांनी कापूस, तूर व मका पिकातील प्रगत तंत्रज्ञान व अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर सखोल मार्गदर्शन केले. अनिल चौधरी यांनी भाजीपाला रोप वाटिका व उत्पादन तंत्रज्ञान समजावून सांगितले. आनंद खंडेलवाल यांनी ठिबक व तुषार सिंचनाचे फायदे प्रात्यक्षिकासह दाखवले. पद्माकरभाऊ चिंचोले यांनी "नैसर्गिक शेती हीच काळाची गरज" यावर भर दिला. तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी शासनाच्या विविध योजना, सूक्ष्म अन्नद्रव्ये, शेतमाल प्रक्रिया व लाईव्ह बाजार व्यवस्थेची माहिती दिली. खरीप हंगाम तोंडावर आहे. उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचे असेल तर प्रगत तंत्रज्ञान व नैसर्गिक शेतीचा अवलंब करा. आत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांसाठी बाजार व्यवस्था उभी केली तर खऱ्या अर्थाने शेतकरी स्वावलंबी होईल."कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व नैसर्गिक शेतीसाठी नोंदणी केली. "अधिकाऱ्यांनी थेट मार्गदर्शन केल्याने शेतकऱ्यांमध्ये कृषी विषयक जनजागृती झाली" अशी प्रतिक्रिया खेर्डा बु. येथील शेतकरी प्रविण भोपळे यांनी दिली .समस्त ग्रामस्थ खेर्डा खु. व खेर्डा बु. यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर राऊत , उपकृषी अधिकारी ए व्ही बोंबटकार , अविनाश राऊत सहाय्यक कृषी अधिकारी अविनाश गाडगे यांनी प्रयत्न केले .

Previous Post Next Post