जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कागदांचा तुटवडा; तक्रारदारांना हेलपाटे, वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी...


 जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कागदांचा तुटवडा; तक्रारदारांना हेलपाटे, वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी...

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

नागरिकांच्या तक्रारी तत्काळ स्वीकारून त्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे ही पोलीस प्रशासनाची मूलभूत जबाबदारी असताना जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रारीची प्रत देण्यासाठीच कागद उपलब्ध नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे तक्रारदाराला दोन दिवस हेलपाटे मारावे लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

तालुक्यातील सावरगाव येथील वासुदेव महादेव फाटे यांचा मोबाईल हरविल्याने त्यांनी १३ जून रोजी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार स्वीकारण्यात आली; मात्र तिची प्रत देण्यासाठी आवश्यक कागद (पेजेस) उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना बराच वेळ पोलीस ठाण्यात थांबावे लागले. अखेर प्रत न मिळाल्याने ते घरी परतले.दरम्यान, फाटे यांचे मावसभाऊ तथा पत्रकार विनोद चिपडे यांनी १४ जून रोजी दुपारी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारीच्या प्रतीबाबत विचारणा केली असता, त्यांनाही सुरुवातीला "पेजेस संपले आहेत" असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर एका कर्मचाऱ्याने आपल्या वैयक्तिक ड्रॉवरमधून कागद काढून तक्रारीची प्रत उपलब्ध करून दिली.

वासुदेव फाटे यांनी सांगितले की, ते प्रथम तक्रार देण्यासाठी गेले असता काही कर्मचाऱ्यांनी "लोकांच्या मोठमोठ्या वस्तू हरवतात, तुमचा तर मोबाईल हरवला आहे," अशा आशयाची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे त्यांच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली.आजच्या डिजिटल युगात मोबाईल हरवणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. मोबाईलमध्ये बँकिंग व्यवहार, वैयक्तिक माहिती, सामाजिक माध्यमांची खाती तसेच इतर महत्त्वाची माहिती असल्याने तक्रार तत्काळ नोंदवून तिची प्रत मिळणे आवश्यक असते. मात्र तक्रारीची प्रत मिळविण्यासाठीच नागरिकांना वारंवार पोलीस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत असतील, तर ही बाब चिंताजनक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.या प्रकारामुळे पोलीस ठाण्यातील कार्यालयीन साहित्याचा पुरवठा, प्रशासकीय नियोजन आणि नागरिकांशी संवाद याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्वसामान्य नागरिक न्याय आणि मदतीच्या अपेक्षेने पोलीस ठाण्यात जातात. त्यामुळे अशा प्रकारांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous Post Next Post