वरवट बकालच्या आरोग्य सेवेचा ‘कायापालट’: ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला ३६.४० कोटींची प्रशासकीय मंजुरी!


 वरवट बकालच्या आरोग्य सेवेचा ‘कायापालट’: ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला ३६.४० कोटींची प्रशासकीय मंजुरी!संग्रामपूर तालुक्यासाठी आमदार डॉ. संजय कुटे यांच्या प्रयत्नांना मोठे यश; आरोग्य यंत्रणा होणार हायटेक!

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील वरवट बकाल येथील आरोग्य सुविधा आता अधिक सक्षम होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालय उभारणीच्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाने अखेर प्रशासकीय मान्यता दिली असून, या प्रकल्पासाठी तब्बल ३६ कोटी ४० लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांच्या बळकटीकरणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आमदार डॉ. संजय कुटे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा त्यांच्या परिसरातच मिळावी, यासाठी ते आग्रही होते. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आल्याने वरवट बकालसह संपूर्ण संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

"वरवट बकाल येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, ही परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी होती. आज या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत ३६.४० कोटींचा निधी मंजूर केला आहे. या रुग्णालयामुळे परिसरातील हजारो रुग्णांचा वेळ आणि पैसा वाचणार असून, त्यांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळणे सुलभ होईल. आपल्या मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

माजी मंत्री आ.डॉ.संजय कुटे जळगाव जामोद मतदारसंघ

रुग्णालयाची वैशिष्ट्ये:

​आधुनिक सोयी-सुविधा: रुग्णालय इमारतीसह निवासी संकुलाचेही बांधकाम होणार.

​तातडीची सेवा: गंभीर रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही.

​आरोग्य सुरक्षा: प्रसूती, मातृत्व सेवा आणि आपत्कालीन उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था.

​विकासाचा नवा टप्पा: या प्रकल्पाच्या उभारणीमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे.शासनाच्या या निर्णयाचे परिसरातून स्वागत होत असून, आमदार डॉ. संजय कुटे यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने आता वरवट बकालचे ग्रामीण रुग्णालय परिसरासाठी ‘आरोग्यदायी कवच’ ठरणार आहे.

Previous Post Next Post