कोरडा ग्रामपंचायत येथे तीन वर्षीय चिमुकलीचा पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू... ग्रामसेवक, संबंधित अधिकारी,पदाधिकारी, कर्मचारी व ठेकेदारावर कारवाईची मागणी...


कोरडा ग्रामपंचायत येथे तीन वर्षीय चिमुकलीचा पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू...
 ग्रामसेवक, संबंधित अधिकारी,पदाधिकारी, कर्मचारी व ठेकेदारावर कारवाईची मागणी...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

चिखलदरा तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायत हद्दीत घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. तीन वर्षीय निष्पाप बालिका नायरा संजू भुसूम हिचा पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून संतापाची लाट उसळली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात जलपुरवठा योजनेअंतर्गत विविध ठिकाणी खड्डे खोदण्यात आले होते. मात्र, काम अपूर्ण ठेवून हे खड्डे उघडेच सोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याच पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडल्याने चिमुकली नायरा हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे.या घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द करावा, तसेच ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि या कामासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर निष्काळजीपणाबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी व दोषींना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

"एका निष्पाप चिमुकलीचा जीव गेला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे," अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच नायरा हिला न्याय मिळावा, यासाठी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जलपुरवठा योजनांच्या कामांमध्ये आवश्यक सुरक्षा उपाय तातडीने राबवावेत, अशी मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रकरणाचा तपास चिखलदरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अंकुश धोटे, काटकुंभ बिटचे जमादार परमार भुसूम, पोलीस कॉन्स्टेबल निलेश तोटे व निलेश भागवत तसेच त्यांच्या पथकाकडून सुरू आहे.
Previous Post Next Post