जळगाव जामोद(प्रतिनिधी):
जळगाव जामोदच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आणखी एक महत्त्वाची विकासाची जोड मिळाली असून, जळगाव जामोद बस आगारासाठी ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेच्या ५ नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा आज जळगाव जामोद बस आगारात मोठ्या उत्साहात पार पडला.महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार डॉ. संजय कुटे यांना दिलेला शब्द पूर्ण करत जळगाव जामोद बस आगारासाठी ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस उपलब्ध करून दिल्या. याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.लोकार्पण सोहळ्याच्या प्रारंभी नवीन बसेसचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर बसेसना पुष्पहार अर्पण करून प्रवाशांच्या सेवेसाठी त्यांचे लोकार्पण करण्यात आले. नवीन बसेसच्या उपलब्धतेमुळे जळगाव जामोद परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार आहे.एस.टी. महामंडळाच्या सेवेत या ५ नवीन बसेसमुळे मोलाची भर पडली असून, ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी ही बससेवा अधिक सोयीची ठरणार आहे.या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार डॉ. संजयभाऊ कुटे यांचे प्रतिनिधी म्हणून राजू कुटे, आगार व्यवस्थापक मुकुंद न्हावकर, एस.टी. आगारातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जळगाव जामोदच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी विकासाची वाटचाल अखंडपणे सुरूच असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेसची उपलब्धता हा निश्चितच एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
