सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
संतनगरी शेगावातील वाढती वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शहराला वळणमार्ग (रिंग रोड/बायपास) मंजूर करावा, तसेच रेल्वे स्थानक ते श्री संत गजानन महाराज मंदिरादरम्यान स्कायवॉक उभारावा, अशी मागणी आमदार डॉ. संजय कुटे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. नागपूर येथे झालेल्या भेटीत शेगावच्या पायाभूत सुविधा आणि भविष्यातील वाहतूक नियोजनाबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून दररोज हजारो भाविक शेगाव येथे येतात. सण, उत्सव आणि सुट्टीच्या काळात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरातील प्रमुख मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे नागरिक आणि भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून शहराबाहेरील बाजूनेवळणमार्ग उभारण्याची आवश्यकता असल्याचे आमदार डॉ. कुटे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.याशिवाय, रेल्वेने येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता रेल्वे स्थानकापासून श्री संत गजानन महाराज मंदिरापर्यंत सुरक्षित, सुलभ आणि वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी स्कायवॉक उभारण्याचीही त्यांनी मागणी केली. या प्रकल्पामुळे भाविकांना रस्ता ओलांडण्याचा धोका कमी होईल, तसेच शहरातील वाहतुकीवरील ताणही कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. या दोन्ही मागण्यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेत संबंधित प्रस्तावांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
