जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त जळगाव जामोदात छायाचित्रकारांचा उत्साहात स्नेहमेळावा...


 जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त जळगाव जामोदात छायाचित्रकारांचा उत्साहात स्नेहमेळावा...

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

जगभरातील छायाचित्रकारांच्या कलेचा आणि योगदानाचा गौरव करणारा जागतिक फोटोग्राफर दिन आज, दि. १९ ऑगस्ट रोजी जळगाव जामोद शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील लक्ष्मी डिजिटल फोटो स्टुडिओ येथे स्थानिक छायाचित्रकारांच्या उपस्थितीत या दिनाचे आयोजन करण्यात आले.छायाचित्रण ही केवळ प्रतिमा टिपण्याची कला नसून, एखाद्या क्षणाला कायमस्वरूपी आठवणींच्या रूपात जतन करण्याचे प्रभावी माध्यम आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात छायाचित्रण क्षेत्रातही मोठे बदल झाले असून, डिजिटल कॅमेरे, आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या संधींमुळे या क्षेत्राला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकारांनी एकमेकांना शुभेच्छा देत आपल्या क्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण केली.यावेळी अश्विन राजपूत,योगेश सातव,सतीश हागे, सुपेस नागपुरे, दीपसिंग चव्हाण, स्वप्निल हिस्सल, निखिल बोडखे, निखिल उमाळे, वैभव जाधव, दत्ता घोलप, संजय बडे, आदित्य तायडे आणि विवेक घुले यांच्यासह शहरातील छायाचित्रकार उपस्थित होते.छायाचित्रकारांच्या मेहनतीमुळे विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच कौटुंबिक सोहळ्यांतील महत्त्वाचे क्षण कॅमेऱ्यात कैद होऊन पुढील पिढ्यांसाठी जतन केले जातात. त्यामुळे छायाचित्रकारांचे समाजातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.जागतिक फोटोग्राफर दिनाच्या निमित्ताने झालेल्या या स्नेहमेळाव्यामुळे जळगाव जामोद शहरातील छायाचित्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या माध्यमातून छायाचित्रण क्षेत्रातील बंधुभाव, परस्पर सहकार्य आणि नव्या तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करण्याचा संदेशही देण्यात आला.

Previous Post Next Post