जळगाव जामोद(प्रतिनिधी);
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने मातोश्री नथियाबाई विद्यालय, सुनगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात व्यसनाचे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि शैक्षणिक जीवनावर होणारे गंभीर दुष्परिणाम उदाहरणांसह स्पष्ट करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान कुमारी दीदी, माजी शिक्षण विस्तार अधिकारी गोमासे तसेच अरूण कपले यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. व्यसनाची सुरुवात अनेकदा छोट्या सवयीपासून होते; मात्र पुढे त्याचे रूपांतर गंभीर समस्येत होऊ शकते, असे सांगत वक्त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाच्या विळख्यात अडकण्यापासून सावध केले.व्यसनामुळे आरोग्याची होणारी हानी, शिक्षणावर होणारा परिणाम, कुटुंबातील तणाव, आर्थिक नुकसान तसेच सामाजिक जीवनावर होणारे दुष्परिणाम याबाबत विविध उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ‘व्यसनापेक्षा शिक्षणाची आणि चांगल्या संस्कारांची निवड करा’, असा संदेश यावेळी देण्यात आला.यावेळी विद्यालयातील समस्त शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहण्याची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही व्यसनांपासून स्वतः दूर राहण्यासोबतच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्याचा संकल्प केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एफ. सोळंके सर उपस्थित होते. मंचावर सर्व मान्यवर वक्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका राजपूत मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन शिक्षण सेवक कुलट सर यांनी केले.यावेळी ज्येष्ठ शिक्षिका घोटेकर मॅडम,ज्येष्ठ शिक्षक एस. डब्ल्यू. इंगळे सर यांच्यासह विद्यालयातील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ज्ञान आणि मार्गदर्शनाने भारलेल्या या कार्यक्रमाची सांगता ‘ओम शांती..’ या मंगलमय उच्चाराने करण्यात आली.
