खामगाव शहर पोस्टेचे ठाणेदार पवार यांची धडक कारवाई नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
प्रतिबंधित नायलॉन मांजाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आज शहर पोलिसांनी स्थानिक मोची गल्ली भागात छापा मारुन तिघांवर कारवाई करत ७ हजार किंमतीचा घातक नायलॉन मांजा जप्त केला आहे. मकरसंक्रातीचा सण जवळ आल्यामुळे सर्वत्र पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. मात्र पतंग उडवताना घातक अशा नायलॉन मांजाचा वापर होत असून यामुळे राज्यभरात अनेक दुर्घटना घडत आहेत. नायलॉन मांजामुळे पक्षांचा मृत्यू होतो. तसेच काही ठिकाणी नागरिकही जखमी झाले आहेत.नायलॉन मांजा अडकल्याने जिल्ह्यात अनेकजण जखमी झाले आहेत. खामगाव शहरातही असे काही प्रकार घडले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान शहर पोलिसांनी आज सकाळी स्थानिक मोची गल्ली भागात छापा मारुन नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एका महिलेसह तिघांवर कारवाई करत त्यांच्या जवळून ७ हजार किंमतीचा प्रतिबंधीत नायलॉन मांजा जप्त केला आहे. पोलिसांनी नायलॉन मांजा विकणारे आशा सुनिल पवार, नरेंद्र सुरेश चव्हाण व जितेंद्र उत्तमचंद गोयल या तिघांवर शहर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे..
