आंतरराष्ट्रीय भाला फेक स्पर्धेत नेपाळ मध्ये जिंकले सुवर्ण पदक...हिवरखेड चा विद्यार्थी मोहम्मद बेग मिर्झाची ऐतिहासिक कामगिरी...
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...
द असोसिएशन फॉर ट्रॅडिशनल युथ गेम्स अँड स्पोर्ट्स तर्फे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत हिवरखेड येथील सेंट पॉल अकॅडमी या शाळेतील वर्ग आठवीचा विद्यार्थी मोहम्मद बेग वसीम बेग मिर्झा या विद्यार्थ्याने पोखरा नेपाळ येथे सुवर्णपदक पटकावून हिवरखेड सह अकोला जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून लवकरच त्याचे विजयी पदक घेऊन हिवरखेड शहरात आगमन होणार आहे. त्याच्या यशाचे श्रेय तो सेंट पॉल अकॅडमीचे अध्यक्ष नवनीत लखोटिया, प्रमोद चांडक, लुनकरण डागा, मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी, उपमुख्याध्यापिका निमिता गांधी मॅडम, क्रीडा प्रशिक्षक अनुप चांदणे आणि सर्व शिक्षक वृंद व आपल्या पालकांना देतो. मोहम्मद हा हिवरखेड चे माजी ग्रामपंचायत सदस्य वसीम बेग मिर्झा यांचा मुलगा आहे. मोहम्मद ने हिवरखेड च्या इतिहासात प्रथमच विदेशात जाऊन भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केल्याने हिवरखेड वासियांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
