जळगाव जामोद प्रेस क्लबचा दणदणीत विजय; मेघ पलनच्या अर्धशतकाने खामगाव G.S संघावर 52 धावांनी मात...


 जळगाव जामोद प्रेस क्लबचा दणदणीत विजय; मेघ पलनच्या अर्धशतकाने खामगाव G.S संघावर 52 धावांनी मात...

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

स्थानिक स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या 14 वर्षांखालील (U-14) एकदिवसीय क्रिकेट सामन्यात जळगाव जामोद प्रेस क्लब संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत खामगाव G.S संघावर 52 धावांनी शानदार विजय मिळवला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत सरस कामगिरी करत जळगाव संघाने प्रतिस्पर्धी संघावर पूर्ण वर्चस्व गाजवले.

प्रथम फलंदाजी करताना जळगाव जामोद प्रेस क्लब संघाने निर्धारित 35 षटकांत 9 बाद 191 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. संघाच्या डावात मेघ पलन यांनी जबरदस्त फलंदाजी करत 57 चेंडूत 70 धावांची आकर्षक खेळी साकारली. त्यांच्या खेळीत 8 चौकारांचा समावेश होता. मेघ यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. त्यांना हुजर खान (28), सोहम इंगळे (15) आणि सार्थक वाघ (नाबाद 7) यांनी चांगली साथ दिली. अतिरिक्त धावांमुळेही संघाच्या धावसंख्येत भर पडली.खामगाव G.S संघाकडून गोलंदाजीत अथर्व  यांनी प्रभावी मारा करत 7 षटकांत 25 धावा देऊन 3 बळी घेतले. प्रेम यांनी 2, तर शिर्ताजे आणि अबय यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना खामगाव G.S संघाची सुरुवात निराशाजनक झाली. जळगावच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक मारा करत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव निर्माण केला. संघाच्या विकेट्स नियमित अंतराने पडत राहिल्याने खामगावला मोठी भागीदारी उभारता आली नाही.या परिस्थितीत अबय यांनी 104 चेंडूत 59 धावांची संयमी आणि जिद्दी खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. प्रेम यांनी 13 धावांचे योगदान दिले. मात्र इतर फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता न आल्याने संपूर्ण संघ 30.3 षटकांत 139 धावांवर बाद झाला.जळगाव जामोद प्रेस क्लबच्या गोलंदाजांनी सामन्यात शिस्तबद्ध गोलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. सार्थक वाघ यांनी 3 बळी घेत खामगावच्या फलंदाजीला मोठा धक्का दिला. मेघ पलन आणि शेख अरफियान शेख इरफान यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. तसेच नोमान मिर्झा यांनी 2, तर साई राऊत यांनी 1 बळी घेत खामगावचा डाव गुंडाळला.सामन्यात अर्धशतक झळकवण्याबरोबरच गोलंदाजीतही योगदान देणाऱ्या मेघ पलन यांच्या अष्टपैलू कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या दमदार खेळीमुळे जळगाव जामोद प्रेस क्लब संघाला मजबूत पाया मिळाला आणि विजयाचा मार्ग सुकर झाला.विजयानंतर संघातील खेळाडूंनी या यशाचे श्रेय सर्वप्रथम ईश्वर, आई-वडील तसेच संघाला सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे जफर खान सर आणि इमरान सर यांना अर्पण केले. या विजयामुळे संघातील युवा खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून क्रिकेटप्रेमींमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Previous Post Next Post