ॲड. अशरफ सादिक पटेल यांची महाराष्ट्र राज्याच्या विधी व न्याय विभागात उपसचिव पदावर पदोन्नती..


 ॲड. अशरफ सादिक पटेल यांची महाराष्ट्र राज्याच्या विधी व न्याय विभागात उपसचिव पदावर पदोन्नती...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

जळगाव जामोद तालुक्यातील पळशी वैद्य येथील मूळ रहिवासी असलेले ॲड. अशरफ सादिक पटेल यांची विधी व न्याय विभाग मंत्रालय, मुंबई येथे उपसचिव या प्रतिष्ठित पदावर पदोन्नती करण्यात आलेली असून या पदापर्यंत अत्यंत कमी वयात पोहोचून त्यांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्ता, कर्तव्य, प्रामाणिक कार्यनिष्ठा व कठीण परिश्रम यांची पावती दिलेली आहे. ॲड. अशरफ पटेल यांना हे समाजसेवेचे व्रत वंश परंपरागत लाभलेले आहे. त्याच अनुषंगाने मंत्रालय मुंबई येथे त्यांचा महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांचे कडून महासंघाचे अध्यक्ष हाजी सैपनजी जतकर यांचे हस्ते व इतर मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी यांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला. त्यांचे पणजोबा सिराजोद्दीन बापूमिया पटेल हे स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक तथा शैक्षणिक चळवळीमध्ये अग्रणी नाव होते. सन 1920 मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी खामगाव येथे घेतलेल्या शिक्षण परिषदेमध्ये महाराजांच्या  आवाहनाला प्रतिसाद म्हणून सिराजोद्दीन पटेल गुरुजी जे स्वतः मुख्याध्यापक होते  त्यांनी तत्कालीन पुरोगामी चळवळीत स्वतः भाग घेऊन देणगी स्वरूपात भरीव आर्थिक मदत केली होती. तसेच त्यांचे आजोबा प्रख्यात शिक्षणतज्ञ, बापूमिया सिराजोद्दीन पटेल गुरुजी सन 1944 चे स्वातंत्र्यापूर्वीचे किंग एडवर्ड कॉलेज व नंतरचे विदर्भ महाविद्यालय, अमरावती चे विज्ञान शाखेचे पदवीधर होते.  त्यांनी तत्कालीन देशाचे प्रथम कृषी मंत्री भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नेतृत्वात श्री शिवाजी शिक्षण संस्थेत संस्थापक सभासद राहून त्यांचे समवेत भरीव शैक्षणिक कार्य केले आहे.  त्यांनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून तह हयात शैक्षणिक कार्य केले. त्यांचे वडील, विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित तसेच मा. राज्यपाल यांनी गुणश्री प्राध्यापक  म्हणून कायम स्वरुपी नियुक्ती केलेले डॉक्टर सादिक बापूमिया पटेल यांनी आपल्या वडिलांचा समाजसेवेचा वारसा चालवत आपल्या सेवेतून तळागाळातील लोकांना जे. जे. रुग्णालय,  मुंबई यासारख्या नामांकित ठिकाणी गोरगरीब लोकांना रुग्ण सेवा दिली.  त्यांचे काका ॲड. हमीद बापूमिया पटेल हे सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागात अवर सचिव ते प्रधान सचिव पदापर्यंत सेवेत कार्यरत होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून शासनाच्या अनेक धोरणात्मक कायदे निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून व इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी शासनाने गठित केलेल्या बांठीया आयोगावर कायदेतज्ञ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली ज्यामुळे त्यांनी आपला विदर्भ तसेच बुलढाणा जिल्ह्याला गौरव प्राप्त करून दिला. तसेच त्यांचे काका ॲड.  सलीम बापूमिया पटेल हे सुद्धा केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्रामध्ये अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी युवक कल्याणासाठी युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत व्हावी म्हणून आपली उत्कृष्ट सेवा प्रदान केली.  तदनंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून केजी ते पीजी पर्यंतचे उत्कृष्ट शैक्षणिक दालन उपलब्ध करून दिले. त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण, आदिवासी भागातील सर्व स्तरातील मुले व मुली आज ग्रामीण भागातच दर्जेदार शिक्षणाचा लाभ घेत आहेत. अशाप्रकारे ह्या गौरवशाली परंपरेनुसार ॲड. अशरफ पटेल यांना अत्यंत कमी वयात मिळालेल्या यशाच्या माध्यमातून समाजसेवेचा वारसा हा पटेल परिवाराचा सेवाभाव कायम राखण्याची साक्ष देणारा आहे त्यांच्या या यशामुळे पटेल परिवारासोबतच पळशी वैद्यसह बुलढाणा जिल्हा व ग्रामीण परिसराचा निश्चितच नावलौकिक वाढलेला आहे. त्यांच्या या नियुक्तीने ग्रामीण परिसरातील विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये एक प्रेरणा निर्माण झाली असून परिसरातील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय अशा सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदना चा वर्षाव होत आहे.

Previous Post Next Post