जळगाव जामोद(प्रतिनिधी):
शहरातील बालाजी मंदिराजवळील बालाजी ट्रेडिंग दुकानातून तब्बल ९० हजार रुपये रोख आणि चार बँकांची आठ चेकबुक अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, चोरीची घटना ३० जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद असून, या प्रकरणी २ ऑगस्ट रोजी दुपारी ३.२१ वाजता जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी हरीदास माणिकराम माटे (वय ४५, व्यवसाय धान्य व्यापार) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, घरून आणलेली हिरव्या रंगाची पिशवी दुकानातील काउंटरच्या उजव्या कोपऱ्यात ठेवण्यात आली होती. त्यामध्ये ९० हजार रुपये रोख तसेच चार बँकांची आठ चेकबुक होती. अज्ञात व्यक्तीने दुकानात प्रवेश करून काउंटरवरून पिशवी चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणी कायमी अप क्र. ४९५/२०२६, कलम ३०५ BNS अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मपोहेकॉ वानखडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.फिर्यादी माटे यांच्या म्हणण्यानुसार, चोरीनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती; मात्र तक्रार दाखल होण्यास तीन दिवसांचा कालावधी गेला आणि अखेर चौथ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला. दुकानात CCTV कॅमेरे असल्याचे सांगितले जात असल्याने, चोरी घडल्याच्या दिवशीच CCTV फुटेज तपासून संशयिताचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असती तर तपासाला अधिक वेग आला असता का? असा सवाल उपस्थित होत आहे.चोरीच्या घटनेनंतर तक्रार नोंदविण्यास झालेल्या विलंबाबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असून, तक्रार दाखल करण्यास नेमका विलंब का झाला? CCTV फुटेज तातडीने तपासण्यात आले का? आणि पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ कोणती कार्यवाही केली? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आता CCTV फुटेज, घटनास्थळावरील परिस्थिती आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान तपास पथकासमोर आहे.
