शेतकऱ्यांना वीजपुरवठ्यात ‘ब्रेक’ नको!; प्रश्न तातडीने सोडवा.आमदार डॉ. संजय कुटेंची महावितरण अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना;


 शेतकऱ्यांना वीजपुरवठ्यात ‘ब्रेक’ नको!; प्रश्न तातडीने सोडवा.आमदार डॉ. संजय कुटेंची महावितरण अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना; रोहित्रे व वीजवाहिन्यांच्या समस्यांचा घेतला आढावा...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील महावितरणशी संबंधित विविध प्रश्न व समस्यांचा आढावा घेण्यासाठी आमदार डॉ. संजय कुटे यांनी येथील विश्रामगृहात महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी शेतकऱ्यांना शेती व सिंचनासाठी नियमित, सुरळीत आणि विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.बैठकीत मतदारसंघातील कृषी वीजपुरवठा, रोहित्रांशी संबंधित समस्या, वीजवाहिन्या तसेच विविध तांत्रिक अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वीजपुरवठ्यातील अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत आमदार डॉ. संजय कुटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.शेतीची कामे आणि सिंचनासाठी शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळणे अत्यंत आवश्यक आहे. वीजपुरवठ्याअभावी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी महावितरणने दक्षता घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात, अशा सूचना आमदार कुटे यांनी दिल्या.मतदारसंघातील शेतकऱ्यांना दीर्घकालीन स्वरूपात सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी तांत्रिक अडचणींचे कायमस्वरूपी निराकरण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. रोहित्रे व वीजवाहिन्यांशी संबंधित समस्या प्राधान्याने सोडवून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देत, त्यांना विश्वासार्ह व अखंडित वीजपुरवठा मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी यावेळी सांगितले. बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post Next Post