राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी निवडलेल्या खेळाडूंचा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार...


 राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी निवडलेल्या खेळाडूंचा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

एरोबिक्स जिम्नॅस्टिक्सच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील चार खेळाडूंची निवड झाल्याबद्दल त्यांचा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावर निवड होणे ही खेळाडूंच्या मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीची पावती असून, या यशामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.राष्ट्रीय स्पर्धेसाठी Youth Mixed Pair या गटातून सोहम बुरुकले व सिद्धी माळ, Junior Individual गटातून श्रीकांत हाडोळे, तर Junior Mixed Pair गटातून अक्षय पायगण व अनघा शेळके यांची निवड झाली आहे.यावेळी आमदार डॉ. संजय कुटे यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ग्रामीण व जिल्हास्तरावरील खेळाडूंनी सातत्याने मेहनत घेत राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.या खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय स्पर्धेत धडक मारत बुलढाणा जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचविले आहे. आगामी स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.सत्कार सोहळ्यास महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेते, उपाध्यक्ष उत्तम लटपटे, इंद्रजीतसिंग राठोड, सचिव डॉ. मकरंद जोशी तसेच बुलढाणा जिल्हा जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे सचिव राहुल पहुरकर उपस्थित होते. त्यांनीही राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.राष्ट्रीय स्तरावर झेप घेणाऱ्या या युवा खेळाडूंच्या यशामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जिम्नॅस्टिक्स क्षेत्रातील नवोदित खेळाडूंनाही निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.

Previous Post Next Post