जळगाव जामोद(प्रतिनिधी):
केंद्र सरकारकडून होऊ घातलेल्या जातनिहाय जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात यावा, तसेच जातनिहाय माहितीची स्वतंत्र नोंद घेण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसच्या ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची मुंबई येथील राजभवनात भेट घेतली. काँग्रेस नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत जळगाव जामोद येथील काँग्रेस ओबीसी नेते राजीव घुटे यांचा विशेष सहभाग होता.शुक्रवारी (दि. ११) राजभवनात झालेल्या सुमारे अर्धा तासाच्या बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. काँग्रेस ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. भानुदास माळी यांनी प्रास्ताविकातून ओबीसी समाजासमोरील विविध प्रश्नांचा ऊहापोह केला.यावेळी आ. नानाभाऊ पटोले यांनी ओबीसी समाजासह शेतकऱ्यांच्या विविध अडचणी राज्यपालांसमोर मांडल्या. राजीव घुटे यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळताना येणाऱ्या अडचणींकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. तर डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी एसआयआर तसेच जनगणनेमध्ये वडार समाजासह भटक्या-विमुक्त जमातींवर स्थलांतरामुळे अन्याय होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आणून दिले.बैठकीत ओबीसी जनगणना, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, नोकरभरती, पदोन्नती तसेच ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. जातनिहाय जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद झाल्यास समाजाच्या लोकसंख्येच्या वस्तुनिष्ठ आकडेवारीच्या आधारे भविष्यातील धोरणे आणि योजनांची आखणी करण्यास मदत होईल, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली.या बैठकीस किशोर कान्हेरे, विजय राऊत, विमल कटरे, अनंत मोहोळ, जीवन चाकणकर, धनराज राठोड, मंगल भुजबळ, दिगंबर राऊत, तुषार पेंढारकर, उमाकांत धांडे, विनोद अहिरकर, शैलेश राऊत, अशोक खलाने, ॲड. शुभांगी शेरेकर यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील ३२ प्रतिनिधी उपस्थित होते.बुलढाणा जिल्ह्यातून काँग्रेसचे ओबीसी नेते राजीव घुटे हे एकमेव प्रतिनिधी म्हणून या शिष्टमंडळात सहभागी झाले होते.
