अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड येथील माऊली मल्टीस्टेट को-क्रेडिट सोसायटी नाशिक ची शाखा हिवरखेड मार्फत ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशन येथे 17 आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.अप. क्र. 517/2026 कलम 318(4), 316(5), 61(2) BNS सह कलम 3 महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये फिर्यादी रमेश ज्ञानदेवराव उगले (वय 67, सेवानिवृत्त शिक्षक, रा. बारगनपुरा, हिवरखेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या दोन्ही खात्यात मिळून 41 लाख 16 हजार 689 रुपये ठेवी म्हणून ठेवण्यात आले होते. आरोपींनी आकर्षक व फसव्या व्याजदराचे आमिष दाखवून हिवरखेड शाखेतील अंदाजे पावणे आठशे पेक्षा जास्त ठेवीदारांकडून एकूण 4 कोटी 41 लाख 53 हजार 111 रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवी म्हणून जमा करून घेतली. मुदत संपल्यानंतरही मुद्दल व व्याजाची रक्कम परत न करता टाळाटाळ करून ठेवीदारांची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हिवरखेड विकास मंच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तसेच सर्व ठेवीदारांच्या संघर्षाला आणि पाठपुराव्याला पहिले यश आले असून माऊली मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नाशिक च्या हिवरखेड येथील शाखेमार्फत शेकडो ठेवीदारांची आणि गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी जी फसवणूक झालेली आहे त्या विरोधात दोषींविरुद्ध अखेर गुन्हे दाखल झाले आहेत.आरोपीं विरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने तपासाची चक्रे वेगाने फिरतील आणि पीडित व्यक्तींना न्याय मिळेल असा विश्वास आणखी दृढ झाला आहे. सदर प्रकरणाचा व्याप खूप मोठा असल्याने आणि फसवणूक झालेली रक्कम कोट्यावधींच्या घरात असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.कोट्यावधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी माऊली मल्टीस्टेटच्या नाशिक सह हिवरखेडचे संचालक मंडळ आणि कर्मचारी अशे एकूण 17 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एकूण पावणे आठशेच्या वर नागरिकांच्या तक्रारी हिवरखेड पोलीस स्टेशन मध्ये प्राप्त झाल्या होत्या.संबंधित दोषींवर कारवाई करण्यासाठी हिवरखेड विकास मंच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, अनेक जागरूक नागरिक, पत्रकार बांधव सातत्याने पाठपुरावा करीत होते. सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज पत्रकार अर्जुन खिरोडकार गणेश सुरजुसे बाळासाहेब नेरकर जमीर शेख राजू खान ह्या सर्वांनी अपर पोलीस अधीक्षक आणि सहायक पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देऊन त्यांना प्रकरणाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले होते.ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी,उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या आदेशाने ठाणेदार सचिन पाटील मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले, देवानंद कायंदे,आर्थिक गुन्हे शाखेचे अनिल जुमडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी यशस्वी रित्या पूर्ण केली.आरोपीमध्ये 1) डॉ. सुनील मोहन सरोदे 2) निकेत राजू धोटे 3) मिलिंद अनिल सोनवणे 4) ऋषिकेश सुनील सरोदे 5) अनिल बलभीम साळुंखे 6) ओमप्रकाश चतुरकार 7) कु. पूजा मनोज उगले 8) राजेश उर्फ मिलिंद निवृत्ती गावंडे 9) कृष्णा जगन्नाथ सित्रे 10) डॉ. रामदास काशीराम धुळे 11) शिवाजी रामकृष्ण नराजे 12) प्रवीण नामदेवराव येऊल 13) आशिष दिलीप नाठे 14) डॉ. अभिजीत रमेश उगले 15) अनिल रामकृष्ण गावंडे 16) अनुराग रमेशचंद्र गुप्ता 17) शादिद खान शहागीर खान (राजू खान)सदर गुन्ह्याचा तपास पो.नि. अनिल जुमळे, आर्थिक गुन्हे शाखा, अकोला हे करीत आहेत.
