जिगाव प्रकल्पासाठी 35 हजार कोटींचा निधी तातडीने मंजूर करा!केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे लेखी मागणी...


 जिगाव प्रकल्पासाठी 35 हजार कोटींचा निधी तातडीने मंजूर करा!केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे लेखी मागणी...

बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी) : 

अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची हमी देणाऱ्या महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी प्रस्तावित 35 हजार कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा, अशी जोरदार मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी 14 ऑक्टोबर रोजी लेखी पत्राद्वारे मागणी केली.

जिगाव प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर आणि खामगाव या सहा तालुक्यांतील तसेच अकोला जिल्ह्यातील बाळापूर व तेल्हारा तालुक्यातील एकूण 287 गावांमधील 1 लाख 16 हजार 770 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाची जलक्षमता 26.01 टीएमसी असून, पहिल्या टप्प्यातील सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.प्रकल्पाच्या उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील कामांना गती देण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या e-PAMS (Electronic Project Appraisal Management System) प्रणालीद्वारे प्रस्ताव पुढे नेण्यात आला आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीला आपण स्वतः उपस्थित होतो. या बैठकीत प्रकल्प पुढे नेण्यासाठी आवश्यक दिशा निश्चित करण्यात आल्याचे प्रतापराव जाधव यांनी सांगितले.जिगाव प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक असलेल्या 35 हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केंद्रीय जल आयोगाच्या अध्यक्षांकडे करण्यात आली असून, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही करण्यात आली आहे, अशी माहितीही जाधव यांनी दिली.

सध्या अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतीला कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिगाव प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक असलेल्या 35 हजार कोटी रुपयांच्या निधीला केंद्र शासनाने तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे केली आहे.

Previous Post Next Post