महापुरुषांना अभिवादन अन् कर्तृत्वाचा गौरव; जळगाव जामोद नगरपरिषदेत विशेष कार्यक्रम...


 महापुरुषांना अभिवादन अन् कर्तृत्वाचा गौरव; जळगाव जामोद नगरपरिषदेत विशेष कार्यक्रम...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज 2 ऑक्टोबर 2026 रोजी जळगाव जामोद नगरपरिषदेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर नगराध्यक्ष गणेश दांडगे यांच्या आदेशानुसार नगरपरिषदेच्या वतीने देशसेवेत योगदान देणाऱ्या निवृत्त सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सैनिकांनी बजावलेल्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.तसेच नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत नगरपरिषद उर्दू शाळेच्या क्रिकेट संघातील सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.कोविड-19 महामारीच्या काळात नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’मधील कोविड योद्धे डॉक्टरांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कठीण काळात आरोग्यसेवा देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल नगरपरिषदेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष गणेश दांडगे होते. यावेळी उपनगराध्यक्ष कैलास पाटील, आरोग्य सभापती परमानंद राजपूत, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. सूरज जाधव, नगरसेविका वैशाली तायडे आणि स्वीकृत नगरसेवक सचिन जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाला नगरपरिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गांधीजींच्या सत्य, अहिंसा व स्वच्छतेच्या विचारांसह लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेच्या आदर्शांना अभिवादन करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post Next Post