जळगाव जामोद(प्रतिनिधी);
बालकांचे आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने झाडेगाव येथील अंगणवाडी केंद्र क्र. २ मध्ये ‘सेवा संकल्प व पोषण महिना’ अंतर्गत विविध उपक्रम उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला माता-भगिनी, अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी पर्यवेक्षिका प्राजक्ता किनगे यांची प्रमुख उपस्थिती होती. पिंपळगाव बीड परिसरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेविका छाया प्रशांत तायडे यांनी केले. बालकांच्या निरोगी वाढीसाठी संतुलित आहार, स्वच्छता आणि योग्य पोषण किती आवश्यक आहे, याबाबत त्यांनी उपस्थित माता-भगिनींना मार्गदर्शन केले. घरच्या घरी उपलब्ध असलेल्या पौष्टिक पदार्थांचा योग्य वापर करून बालकांना सकस आहार देता येतो, यावर त्यांनी भर दिला.यावेळी अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. विविध खाद्यपदार्थ व कडधान्यांची प्रत्यक्ष मांडणी करून त्यांच्या पोषणमूल्यांची माहिती देण्यात आली. स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचा दैनंदिन आहारात समावेश करण्याचे आवाहन करण्यात आले.पर्यवेक्षिका प्राजक्ता किनगे यांनी बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी संतुलित आहारासोबतच स्वच्छता, आरोग्य तपासणी आणि नियमित काळजी घेण्याचे आवाहन केले. बालकांचे आरोग्य ही केवळ अंगणवाडीची नव्हे, तर कुटुंब आणि समाजाचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात माता-भगिनींसाठी बौद्धिक व शारीरिक विकासाला प्रोत्साहन देणारे विविध खेळ व मनोरंजक उपक्रम घेण्यात आले. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच माता-भगिनींचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन वर्षाताई पांडव यांनी केले.पोषणाबाबत जनजागृती, बालकांच्या आरोग्याची काळजी आणि माता-भगिनींचा सक्रिय सहभाग यातून ‘सुदृढ कुटुंब आणि सक्षम समाज’ घडविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
