अहिंसा, सेवा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश’ ; आसलगाव बाजार येथील त्रिमूर्ती कला,वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन..
जळगाव जामोद(प्रतिनिधी):
त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय,आसलगाव बाजार येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य विद्या काटले मॅडम होत्या. यावेळी महात्मा गांधी यांच्या अहिंसा व सत्याच्या विचारांना, तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या प्रेरणादायी घोषणेच्या माध्यमातून शेतकरी व जवानांच्या योगदानाला उजाळा देण्यात आला.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य विद्या काटले यांनी या महान विभूतींचे विचार व गुण आत्मसात करण्याचे आवाहन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला अहिंसेच्या मार्गाची दिलेली प्रेरणा ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.देशाचा शेतकरी आणि सीमेवर लढणारा सैनिक ही राष्ट्राची महत्त्वाची बलस्थाने असून त्यांचा आदर व सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सदैव तत्पर राहावे, असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
