खेळातून बुद्धिमत्तेला चालना! नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये कन्या सन्मानचा उपक्रम..!


खेळातून बुद्धिमत्तेला चालना! नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये कन्या सन्मानचा उपक्रम..!

जळगाव जामोद(प्रतिनिधी): 

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी, त्यांच्यामध्ये तर्कशक्ती, विचारक्षमता आणि समस्या सोडविण्याचे कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने ‘कन्या सन्मान’ उपक्रमांतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक ३, जळगाव जामोद येथे शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी विद्यार्थ्यांना बौद्धिक खेळांचे साहित्य तसेच पेन, पेन्सिल आणि पाऊचचे वाटप करण्यात आले.सन्मान परिवाराचे मुख्य संयोजक प्रा. शाम फाफट यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू भगत होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख उपस्थित होते. यावेळी सन्मान परिवाराचे सदस्य राजेश कोकाटे आणि वैभव वाघ यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेले बुद्धिमत्ता विकासाचे विविध खेळ शाळेला भेट देण्यात आले. प्रा. शाम फाफट यांनी आपल्या मार्गदर्शनातून आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही बौद्धिक खेळांचे महत्त्व अधोरेखित केले. या खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आकलनशक्ती, तार्किक विचारक्षमता, एकाग्रता आणि निर्णयक्षमता विकसित होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रमुख अतिथी कैलासबापू देशमुख यांनी ‘कन्या सन्मान’ उपक्रमाचे महत्त्व विशद करताना समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक विकासासाठी अशा उपक्रमांची आज नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू भगत यांनी विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान न घेता उत्तम चारित्र्य, संस्कार आणि जीवनमूल्ये आत्मसात करून आदर्श व्यक्तिमत्त्व घडवावे, यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी सन्मान परिवाराच्या सहकार्याने शाळेत विद्यार्थ्यांची तर्कशक्ती आणि बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी ‘बुद्धिमत्ता विकास खेळ प्रयोगशाळा’ (ब्रेन गेम लॅब) सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला.यावेळी मुख्याध्यापक महादेव सातव, अरुण वानखडे सर, सुनीता कौलकार मॅडम,वर्षा दाभाडे मॅडम,कविता कुमावत मॅडम,कीर्ती सातव मॅडम, सचिन धांडे सर, संजय सोळंके सर, विठ्ठल इंगळे सर यांच्यासह शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post