जळगाव जामोद(प्रतिनिधी);
दिवाळी म्हटले की रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि गोडधोडाची मेजवानी! मात्र, समाजातील गरजू आणि वंचित कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यातच खऱ्या दिवाळीचे सार आहे, याचा प्रत्यय मराठा पाटील युवक समितीने घडवून आणलेल्या एका हृदयस्पर्शी उपक्रमातून आला. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत समितीने ‘वंचितांची दिवाळी’ हा सामाजिक उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला.दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी मराठा पाटील युवक समिती, नांदुरा तालुका व शहर यांच्या वतीने जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी चौकीजवळ असलेल्या भगवान बिरसा मुंडा बेडा येथे हा उपक्रम राबविण्यात आला. केवळ मदतीचे साहित्य वाटप करून औपचारिकता न करता आदिवासी बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा आगळावेगळा आदर्श समितीने समाजासमोर ठेवला.या उपक्रमांतर्गत गावातील सुमारे ३५ ते ३७ आदिवासी कुटुंबांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांचा समावेश असलेल्या किराणा किटचे वाटप करण्यात आले. माता-भगिनींना साड्या, पुरुषांना पँट-शर्ट, तर चिमुकल्यांना नवीन कपडे देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. दिवाळीच्या सणात आपल्या कुटुंबालाही नवीन कपडे आणि किराणा साहित्य मिळाल्याने लाभार्थी कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते आदिवासी बांधवांसोबत आयोजित केलेले पारंपरिक सहभोजन! राखीतील रोडगे, वरण, काशिफळ भाजी आणि भात अशा पारंपरिक पदार्थांचा आस्वाद सर्वांनी एकाच पंगतीत बसून घेतला.जात-पात, उच्च-नीच आणि सामाजिक भेदभावाच्या भिंती बाजूला सारत एकत्रित भोजनातून बंधुभाव आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.याप्रसंगी मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे पाटील, जिल्हाध्यक्ष मोहन घुईकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रविण (छोटू) पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शंकर पाटील कोळस्कार, विद्यार्थी समितीचे जिल्हाध्यक्ष शाम मोरखडे, खामगाव तालुकाध्यक्ष अविनाश कुटे पाटील, प्रतिक मिरगे, वैभव धामोडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच नांदुरा तालुक्यातून उद्धवराव गावंडे सर, काटे सर, प्रमोद खोंड, प्रशांत पाटील, पद्माकर ढोले, रघुनाथ पाटील राऊत, अभिनव अढाव, अतुल गव्हाड, प्रथमेश जुनारे, शुभम लांडे, गजानन पद्माकर ढोले, वैभव प्रशांत पाटील आणि नांदुरा तालुकाध्यक्ष दीपक साहेबराव ढोले यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आदिवासी बांधव आणि मराठा पाटील युवक समिती यांच्यात महत्त्वाचा दुवा म्हणून भीमराव पाटील, आकाश जाणे, विशाल पाटील तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला.सातपुड्याच्या निसर्गरम्य कुशीत,आदिवासी बांधवांच्या सहवासात साजरी झालेली ही दिवाळी केवळ एक सामाजिक कार्यक्रम ठरला नाही, तर माणुसकी,आपुलकी, सामाजिक समरसता आणि बंधुभावाचा जिवंत संदेश देणारा अनुभव ठरला. फटाक्यांचा आवाज आणि रोषणाईपेक्षा गरजूंच्या चेहऱ्यावरील हास्य अधिक मोलाचे असते, हे या उपक्रमाने अधोरेखित केले.‘स्वतःच्या घरातील दिवा उजळविण्याबरोबरच दुसऱ्याच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश निर्माण करणे, हाच खऱ्या दिवाळीचा अर्थ!’ हा प्रेरणादायी संदेश देत मराठा पाटील युवक समितीने सलग दुसऱ्या वर्षी सामाजिक बांधिलकीची ज्योत तेवत ठेवली. या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
