जळगाव जामोद (प्रतिनिधी);
जळगाव जामोद-सुनगाव मार्गावर दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या दरम्यान शहरातील राजू वेल्डिंगजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम डावर गोरक्षनाथ (रा. सुनगाव) हे जळगाव येथून मजुरी करून आपल्या घरी परतत होते. दरम्यान, जळगाव जामोद शहरातील राजू वेल्डिंगजवळ त्यांच्या एमएच ५६ डी ९१५७ क्रमांकाच्या होंडा शाईन दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत गंगाराम डावर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला सुनील दिनेश सोळंके (वय १४) हा गंभीर जखमी झाला.अपघाताची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन बागुल, पीएसआय स्नेहा शेंडगे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश टोंगळे व पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन मानकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नगरसेवक सय्यद नफीस, समाजसेवक ओंकार वानखडे तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना जय भवानी रुग्णवाहिकेद्वारे राजू बुटे यांच्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालय, जळगाव जामोद येथे दाखल करण्यात आले.मात्र, वैद्यकीय तपासणीत गंगाराम डावर यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. गंभीर जखमी सुनील दिनेश सोळंके याला पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय, खामगाव येथे हलविण्यात आले आहे.अपघातानंतर धडक देणारे वाहन घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती असून, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती उपलब्ध नव्हती. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेऊन संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
