जळगाव जामोद (प्रतिनिधी) :
जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात अलीकडेच दोन बिबट्यांचा मृतदेह आढळल्याच्या घटनेने वन्यजीव संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी करून बिबट्यांच्या मृत्यूचे नेमके कारण जनतेसमोर आणावे, अशी मागणी दिनांक २६ नोव्हेंबर रोजी पर्यावरण मित्र परिवार, जळगाव जामोद यांच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, मागील १५ ते १६ वर्षांपासून पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, वन्यजीव संरक्षण आणि सामाजिक जनजागृतीसाठी कार्यरत असलेल्या पर्यावरण मित्र परिवाराला दोन बिबट्यांच्या मृत्यूची अधिकृत माहिती वनविभागाकडून न मिळता वृत्तपत्रांच्या माध्यमातून मिळाल्याबद्दल संस्थेने नाराजी व्यक्त केली आहे.निवेदनात बिबट्यांच्या मृत्यूचे कारण आपापसातील संघर्ष असल्याचे सांगण्यात आले असल्यास त्यामागील वैज्ञानिक आधार काय, शवविच्छेदन व फॉरेन्सिक अहवालात काय निष्पन्न झाले, घटनास्थळी खोदण्यात आलेल्या मोठ्या खड्ड्याचे प्रयोजन काय होते, तसेच बिबट्यांच्या वयाबाबत वेगवेगळी माहिती का दिली जात आहे, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. घटनेच्या वेळी वरिष्ठ वन अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक आणि स्थानिक पर्यावरणप्रेमींना विश्वासात घेण्यात आले होते का, याचेही लेखी स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून घटनास्थळावरील उपलब्ध व्हिडिओ चित्रीकरण, उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी, शवविच्छेदन अहवाल आणि वनविभागाने केलेल्या कार्यवाहीचा तपशील उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, केवळ बिबट्यांच्या मृत्यूच्या घटनेपुरतीच मर्यादित न राहता जळगाव जामोद वनक्षेत्राच्या भविष्यातील वन्यजीव संरक्षणासाठीही परिवाराने महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत. अंबाबरवा अभयारण्य ते जळगाव जामोद आणि पुढे मुक्ताईनगर व यावल परिसरादरम्यान संभाव्य वन्यजीव कॉरिडॉरचा शास्त्रीय अभ्यास करावा, वन्यजीवांचे सर्वेक्षण करावे आणि जळगाव जामोद वनक्षेत्राला वन्यजीव अभयारण्य किंवा कायद्यानुसार योग्य संरक्षित क्षेत्राचा दर्जा देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच अतिरिक्त वनकर्मचारी, गस्त व्यवस्था, वन्यजीव बचाव पथक, आधुनिक साधनसामग्री आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.भविष्यात वन्यजीवांचा मृत्यू, वन्यजीवांचा मानवी वस्तीत प्रवेश किंवा बचाव मोहीम यांसारखी गंभीर घटना घडल्यास पर्यावरण मित्र परिवाराला तातडीने अधिकृत माहिती देण्यासाठी वनविभागाने स्वतंत्र कार्यपद्धती (SOP) तयार करावी. स्थानिक पर्यावरणप्रेमी संस्था, पत्रकार आणि सामाजिक संघटनांना समन्वय प्रक्रियेत योग्य सहभाग द्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.'आम्हाला कोणावरही आरोप करायचे नाहीत, आम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे. कोणाशी संघर्ष करायचा नाही, तर वन्यजीवांचे संरक्षण करायचे आहे. प्रसिद्धीपेक्षा पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि पर्यावरण संवर्धनासाठी योग्य सहभाग महत्त्वाचा आहे,' अशी भूमिका पर्यावरण मित्र परिवाराने मांडली आहे.सदर निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यामार्फत वरिष्ठ वनविभाग अधिकारी, जिल्हा प्रशासन, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या संबंधित प्राधिकरणांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच निवेदनातील प्रत्येक मुद्द्यावर लेखी उत्तर आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्याची विनंती करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी प्रसेनजित मिश्रा,चतुर्भुज केला,भिमराव पाटील,सुनील भगत,प्रा. प्रमोदकुमार आमले,दीपक जाधव,बालकृष्ण मानकर,अमर राजपूत यांच्यासह बहुसंख्य पर्यावरण प्रेमी नागरिक उपस्थित होते.
