नगर परिषद खामगांव अंतर्गत खामगांव शहरातील कचरा उचलण्याचा ठेका मे. डी. एम. एंटरप्राईजेस पुणे या कंपनीने घेतला असून खामगांव शहरात या कंपनीत काम करणार्या बहुतांश कामगारांना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्विकारलेले आहे. खामगांव येथील डी. एम. एंटरप्राईजेस मध्ये काम करणार्या कामगारांनी त्यांच्या समस्यांबाबत चर्चा करण्याकरीता मनसे कामगार सेनेच्या वतीने कंपनीच्या वरिष्ठांशी वारंवार पत्रव्यवहार करून देखील आजपर्यंत नगर परिषद, खामगांव किंवा डी. एम. एंटरप्राईजेस यांचे वतीने कोणताही सकारात्मक प्रतिसाद प्राप्त झालेला नाही आणि दिवसेंदिवस कामगारांच्या समस्या वाढतच चालल्या असून त्या सोडविण्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अंतर्गत असलेल्या नगर परिषद घंटागाडी कर्मचारी संघटना (डी. एम. एंटरप्राईजेस, खामगांव) चे शहर अध्यक्ष विक्की भिकाजी शिंदे यांनी या बाबत आवाज उचलला असून येत्या 7 दिवसात न.प. खामगांव व डी. एम. एंटरप्राईजेस यांचे वतीने कामगारांच्या विविध समस्या बाबत चर्चा करून त्या निकाली काढण्यात आल्या नाही तर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाव्दारे दिला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, बुलडाणा, मुख्याधिकारी, न. प. खामगांव आणि इतर संंबंधीतांना देण्यात आल्या असून आता या निवेदनाची दखल घेत न.प. चे अधिकारी आणि डी. एम. एंटरप्राईजेसचे वरिष्ठ हे मनसे कामगार सेनेच्या प्रमुखांशी चर्चा करून कामगारांच्या समस्या निकाली काढण्यास सहकार्य करतात की कामगारांना वार्यावर सोडून त्यांना काम बंद आंदोलन करण्यास भाग पाडतात याकडेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना घंटागाडी कर्मचारी संघटनेच्या सदस्यांचे लक्ष लागले आहे.
मनसे न.प. घंटागाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलनाचा इशारा...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी: - सुरज देशमुख.