पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशांनंतर नांदगाव शहरात साफसफाई व मदतकार्य तातडीने सुरु..

प्रतिनिधी:-राजु भास्करे.

नांदगाव शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांनी दि.११ सप्टेंबर रोजी पाहणी केली. त्यानंतर नांदगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेऊन साफसफाई व मदतकार्य करण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश दिले. त्यानंतर आज तातडीने मालेगाव येथून अग्निशामक दल, स्वच्छता व आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक नांदगाव शहरात दाखल होत साफसफाई व औषध फवारणी सुरवात करण्यात आलेली आहे.पालकमंत्री छगन भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांनी काल नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर घेतलेल्या आढावा बैठकीत महसूल, कृषी, आरोग्य व नगरपरिषदेने पूर्ण ताकदीने काम करुन बाधितांच्या पुर्नवसनाचे काम तातडीने करावे. शेतशिवारासह पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजाप्रती संवेदनशील राहून प्रशासनातील प्रत्येक घटकाने त्याला न्याय देण्याबरोबर त्याच्या पुर्नवसनाची जबाबदारी यथोचितरित्या पार पाडावी. झालेल्या नुकसानीचे पंचनामे व तातडीच्या मदतीसह नुकसान झालेल्या बंधारे व रस्त्याच्या कामाचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.शहरातील गाळ व चिखलामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही यासाठी शहराची साफसफाई तातडीने करण्यात यावी. यासाठी फायर ब्रिगेडची लागणारी यंत्रणा तातडीने मागवून शहरातील सर्व चिखल साफ करण्यात यावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या दुरूस्तीचे कामे तातडीने हाती घ्यावी, तर खंडीत झालेला विज पुरवठा विज वितरण कंपनीने तात्काळ सुरळीत करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच शिवभोजन थाळीत वाढ करून नागरिकांना भोजन उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या.त्यानंतर आज दि.१२ सप्टेंबर रोजी सकाळी नांदगाव शहरात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अग्निशामक दलाचे पथक, गाड्या, स्वच्छता व आरोग्य  कर्मचाऱ्यांची टीम शहरात दाखल झाले असून संपूर्ण शहरात साफसफाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर रोगराई पसरू नये यासाठी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून धूरफवारणी करण्यात येत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आदेशांनंतर नांदगाव शहरातील नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने शिवभोजन थाळीत दुपटीने वाढ करत नागरिकांना भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.त्याचबरोबर आज नांदगांव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील नागरिकांना द्यावयाच्या सहाय्यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी व अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार पंचनामे तातडीने पूर्ण करून जिल्हा नियोजन समितीकडील काही अंशी निधी तातडीच्या कामांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री भुजबळ यांनी दिले. त्याचप्रमाणे तेथील पूर परिस्थितीमुळे रोगराई व साथीचे आजार पसरणार नाहीत यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

 

Previous Post Next Post