बहुजन आदिवासी चळवळीला वाहिलेले संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती असलेले ,ज्येष्ठ,साहित्यिक ,विचारवंत "बिलामतकार"दिनकर दाभाडे पाटील यांचं दिनांक 17 मे पुर्वी जळगाव जामोद येथे आकस्मित दुःखद निधन झालं. दिनकर दाभाडे हे जळगाव जामोद येथील देशमुख वाडी येथील संजय चांडक यांच्या इथे वरच्या मजल्यावरील रुममध्ये भाडेकरू म्हणून राहत होते. सदर त्यांच्या मृत्यूबद्दल दिनांक 17 मे रोजी ते राहत असलेल्या वरील मजल्यावरून दुर्गंधीयुक्त वास आल्याने घरमालकाने खिडकीजवळ जाऊन बघितले असता त्यांना दिनकर दाभाडे हे खाली पडलेले दिसले असता या घटनेची माहिती त्यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली घटनेबद्दल माहिती मिळाल्यामुळे जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद वानखडे, योगेश निबोळकार,सुनील वावगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला साधारण त्यांचा मृत्यू 17 मे च्या पुर्वीच झाला असल्याचे कळते. त्यांचा मृतदेह जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्याकरिता नेण्यात आला होता.दिनकर दाभाडे हे जळगाव जामोद तालुक्यातील सावरगाव येथील मूळ रहिवासी दिनकर दाभाडे यांचा बिलामत आणि गयपात ह्या दोन कादंबऱ्या फारच प्रसिद्ध आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य चळवळीत त्यांचा लौकिक आहे. रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेचे ते विदर्भाचे अध्यक्ष होते. राज्यात झालेल्या विविध साहित्य संमेलनांमध्ये त्यांचे विविध विषयावर परिसंवाद सुद्धा झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आणि शेतकरी संघटना असा त्यांचा राजकीय प्रवास देखील झालेला आहे. "हल्लाबोल" आणि "हुं"ह्या संघटना देखील त्यांनी चालवलेल्या आहेत. आदिवासींसाठी त्यांनी केलेलं कार्य हे विशेष उल्लेख आहे. मृत्युसमयी त्यांचे वय साठ वर्ष होते. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुली ,भाऊ ,जावई असा आप्तपरिवार आहे. बिलामत ह्या त्यांच्या कादंबरीला बिरसा मुंडा पुरस्कार सुद्धा प्राप्त आहे. साहित्य क्षेत्रातील अनेक अनियतकालिकांची संपादन सुद्धा त्यांनी केलेला आहे.
साहित्यिक, विचारवंत, शेतकरी नेते दिनकर दाभाडे काळाच्या पडद्याआड. दिनकर दाभाडे यांचे दुःखद निधन...
जळगाव (जामोद):-
