नैसर्गिक आपत्तीत जीव गमावलेल्या संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील पाच जणांच्या वारसांना राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप-क्रेडिट सोसायटीच्यावतीने आर्थिक साहाय्य देण्यात आले. कार्यकारी संचालक संदीपदादा शेळके यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करुन रोख मदत देत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे २३ जून रोजी अंगावर वीज पडून संजय उत्तम मारोडे व रवी संजय भालतडक यांचा मृत्यू झाला. तर जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ येथील पंजाबराव उत्तमराव उगले व निंभोरा येथील सागर नामदेव दिगडे यांनाही अंगावर वीज पडल्याने जीव गमवावा लागला. नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेले चौघेही जण घरातील कमावते होते. त्यांच्या भरवशावर कुटुंबाचा प्रपंच चालायचा. काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजर्षी शाहू पतसंस्था अशा दुःखद प्रसंगी मृतांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभी राहिली आहे. संस्थेचे कार्यकारी संचालक संदीपदादा शेळके यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करुन प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली. यामाध्यमातून आपले सामाजिक दायित्व निभावले आहे. तालुक्यातील आसलगाव येथील शहीद जवान राहुल श्यामराव मुळे यांच्या कुटुंबियांचीही संदीपदादा शेळके यांनी सांत्वनपर भेट घेतली. तसेच सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल पळशी येथील रोशन कोकाटे यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला. पळशी सुपो संस्थानला भेट दिली असता संस्थानचे अध्यक्ष श्री. देवकर यांनी संदीपदादा शेळके यांचा सत्कार केला. यावेळी मनोज वाघ, समाधान दामधर, नगरसेवक रमेश ताडे, नानाराव पाटील, निळकंठराव देशमुख, यश इधोकार, डॉ. सहदेवराव गोतमारे, कैलास मारोडे, शिरीष मारोडे, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तीतील मृतांच्या वारसांना मदत.राजर्षी शाहू पतसंस्थेची सामाजिक बांधिलकी...
जळगाव जामोद प्रतिनिधी : -
