नांदुरा येथील बेपत्ता सचिन धामोडकर चा मृतदेह सापडला...


अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष...

कामानिमित्त बाहेर जातो असे सांगून गेलेल्या सचिन धामोडकर या ३२ वर्षीय विवाहित तरुणाचा तीन दिवसानंतर मोठ्या हनुमान मंदिरापासून जवळच असलेल्या जुन्या दहिगाव रोडवर बाजूच्या झाडाझुडपांमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने नांदुरा शहरात खळबळ उडाली आहे. सदर तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शहरात विविध चर्चांना पेव फुटले आहे.बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील दरबार गल्ली येथील सचिन गोपाळराव धामोडकर हा तरुण कामानिमित्त बाहेर जातो असे घरच्यांना सांगून १ सप्टेंबर रोजी घरून गेला होता. मात्र तो घरी परत न आल्याने त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. त्यानंतर त्याचे वडील गोपाळराव धामोडकर यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान मोठ्या हनुमानपासून काही अंतरावर असलेल्या जुन्या दहिगाव रोडवर काल सकाळी एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे असलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तो ओळखण्यापलीकडे होता. पोलिसांनी धामोडकर परिवारातील सदस्यांना घटनास्थळी बोलावून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बेपत्ता सचिन नसल्याचे सांगण्यात येत होते मात्र त्याच्या पत्नीने सदर मृतदेह माझा पती सचिनचा असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी पूर्ण सोपस्कार पार पाडून घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन केले त्यानंतर शोकाकुल वातावरणात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिन याच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात असले तरी विविध चर्चांना शहरांमध्ये पेव फुटले असून पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत.

Previous Post Next Post