नगरपरिषद साठी आक्षेप, हरकती नसल्याचे पत्र मुंबई धडकले!कोणत्याही क्षणी निघू शकते हिवरखेड नगरपरिषदेची अंतिम अधिसूचना...

अर्जुन खिरोडकार/ हिवरखेड...

हिवरखेड नगरपरिषद होण्यासाठी एकही आक्षेप अथवा हरकत प्राप्त न झाल्यामुळे हिवरखेड नगर परिषद करण्यासाठी कोणतीही हरकत नसून  हिवरखेड नगर परिषद करावी असा अभिप्राय अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शासनास पाठविल्यामुळे आता नगरपरिषद निर्मितीतील सर्व आडकाठ्या दूर झाल्या असून शासनाद्वारे कोणत्याही क्षणी हिवरखेड नगर परिषदेची अंतिम अधिसूचना निघू शकते. आणि हिवरखेड ग्रामपंचायत बरखास्त होऊ शकते  त्यामुळे हजारो हिवरखेड वासीयांमध्ये उत्साह संचारला आहे.हिवरखेड वासीयांच्या मागणीवरून हिवरखेडला नागरी क्षेत्र घोषित करण्याबाबत विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी वारंवार विधिमंडळात आवाज उचलला होता. ज्या दिवशी आमदार मिटकरी यांनी हा प्रश्न विधिमंडळात पुन्हा उचलला होता त्याच दिवशी मुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकारातून शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिवरखेड नगर परिषदेची प्राथमिक घोषणा केली होती.अकोला जिल्ह्यातील हिवरखेड ग्रामपंचायत चे नगरपरिषद मध्ये रूपांतर करण्याची प्राथमिक उद्घोषणा झाल्यावर नगरपंचायत प्रमाणेच नगरपरिषदेसाठी  सुद्धा शासनातर्फे एक महिन्याच्या आत आक्षेप व हरकती बोलाविल्या होत्या. परंतु यावेळी एकही आक्षेप किंवा हरकत प्राप्त झाली नाही. कारण नगरपंचायत ची प्राथमिक उद्घोषणा झाल्यानंतर बावीस जणांनी आक्षेप हरकती दाखल केल्या होत्या. सोबतच आमदार प्रकाश भारसाकळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचेमार्फत हिवरखेड नगरपंचायत झाल्यास गावाचा विकास खुंटेल आणि लोकांची उपासमार होईल असे अजब गजब तर्कवितर्क देत हिवरखेड नगरपंचायत वर स्थगिती आणली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. आणि नगरपंचायत निर्मितीत आडकाठी आणणाऱ्यांची चांगलीच नाचक्की झाली होती. म्हणून हिवरखेड वासीयांच्या संतप्त जनभावना पाहून आमदार भारसाकळे यांनी नगरपंचायत ऐवजी नगरपरिषद करतो असे सांगितले होते. आणि सामान्य जनतेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे त्यांनी शासनाला हिवरखेड नगरपरिषद करण्याबाबतचे पत्र दिले होते. मागील 23 वर्षांपासून हिवरखेडच्या नागरिकांचा नगरपंचायत अथवा नगरपरिषद व्हावी यासाठी सामुहिक संघर्ष सुरू आहे. राजकीय इच्छाशक्ती अभावी हा विषय आतापर्यंत प्रलंबितच राहिलेला होता. मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत चे अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, उपोषणकर्ते, आंदोलनकर्ते, हिवरखेड विकास मंच, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, लोकजागर मंच, आदर्श पत्रकार संघ, जागरूक आणि विकासप्रेमी नागरिकांनी, विविध लोकप्रतिनिधी,  विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते, संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग, सक्रिय पत्रकार बांधव आणि विविध संघटनांनी आणि रक्तदात्यांनी  निरंतर पाठपुरावा सुरूच ठेवला आहे.आता अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे नगरपरिषद साठी आक्षेप हरकत  नसल्याबाबतचे आणि हिवरखेड नगरपरिषद करावी असे अभिप्राय पत्र अखेर नगर विकास मंत्रालयात धडकले असून आता शासनाच्या अंतिम अधिसूचनेकडे जनतेचे लक्ष लागले आहे.सोबतच यासाठी अनेक वर्षांपासून निरंतर प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या जागरूक नागरिकांसह संपूर्ण हिवरखेड वासियांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

Previous Post Next Post