जलंब येथील स्मशानभूमी शेत रस्त्याने होत असलेली अवैध रेती वाहतूक बंद करा. शेतकऱ्यांची शेगाव तहसीलदारांकडे तक्रार...
सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
जलंब येथील भाग 1 मध्ये असलेल्या स्मशानभूमी शेत रस्त्याने अवैध रित्या सुरू असलेली रेतीची वाहतूक बंद करून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार जलंब भाग 1 मधील शेतकऱ्यांनी शेगाव येथील तहसीलदार दिपक बाजड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे..शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की जलंब भाग 1 शिवारामध्ये असलेल्या स्मशानभूमी या शेतात जाणाऱ्या रस्त्याने येथील रेती माफिया मोठ्या प्रमाणात अवैध रित्या रेतीची वाहतूक करित असल्यामुळे रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यामुळे शेतकऱ्यांना ऐन हंगामाच्या दिवसात शेतातील माल घरी आणणे रस्त्याने कठीण झाले आहे. तसेच सदर रस्त्याने शेतकरी व मजुराला साधे पाई सुद्धा चालता येत नसून शेत रस्त्याने बैल गाडी सुद्धा नेता येत नाही बैलगाडी नेण्याचा प्रयत्न केल्यास बैलाची जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही त्यातही जे शेतात उत्पन्न झाले आहे ते सुद्धा घरी आणता येत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवली आहे.रेती माफीयांनी या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर ने वाहतूक सुरू केल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यामुळे आता शेतमाल घरी कसा आणावा असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यासमोर पडला आहे.येथील अवैध रित्या रेतीची वाहतूक करणारे रेती माफीयांची मोठ्या प्रमाणात दादागिरी असुन शेतकऱ्यांनी त्यांची जर तक्रार केली तर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा रेती माफियांकडून दिल्या जातात. दिवसा ढवळ्या गावातील मुख्य रस्त्याने रात्रंदिवस अवैध रित्या रेतीची वाहतूक सुरू असतांनाही महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी गाभीर्य पूर्वक लक्ष देऊन या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांवर कठोर कारवाई करावी व सदर रस्त्याने सुरू असलेली अवैध रेती वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी. रेती वाहतूक बंद न केल्यास भाग 1 मधील शेतकरी आमरण उपोषण करतील अशा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.सदर निवेदनावर चंद्रशेखर देशमुख, संजय अवचार, गजानन मोहे, महादेव तायडे, विनोद सोनटक्के, गोपाल मोहे, सुरेश सोनटक्के,अनंता नरवाडे, पंजाबराव देशमुख, संतोष धामणकर, गणेश अंसबे यांच्या सह असंख्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत..सदर निवेदनाच्या प्रती आमदार आकाशदादा फुंडकर, जिल्हाधिकारी बुलढाणा, उपविभागीय अधिकारी खामगाव, ठाणेदार जलंब आदींना सुद्धा पाठवण्यात आल्या आहेत...
