राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
आदिवासी विकास विभागा अंतर्गत धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिनिस्त चालणाऱ्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा राणीगाव येथील विद्यार्थी राणीगाव गावाला लागून असणाऱ्या एका सार्वजनिक विहिरीवर आपले जीव धोक्यात घालून कपडे धुताना आणि आंघोळ करताना निदर्शनास आल्यानंतर राणीगाव आश्रम शाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि बेजाबाबदारपणा उघडकीस आला आहे.मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्याच्या प्रमुख उद्दिष्टातून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागाद्वारे वेगवेगळ्या गावांमध्ये आश्रम शाळा चालविली जात आहे. याच आश्रम शाळेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता आदिवासी विकास विभागामार्फत दरवर्षी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो आहे. मात्र गंभीर बाब अशी की, ज्या विद्यार्थ्यांकरीता आदिवासी विभाग दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत आहे त्याच आदिवासी विद्यार्थ्यांचा त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या आश्रम शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणामुळे जीव धोक्यात आल्याचे गंभीर चित्र दिसुन येत आहे. शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा राणीगाव येथील जवळपास 15 ते 20 विद्यार्थी गावाला लागून असणाऱ्या एका सार्वजनिक विहिरीवर आपले कपडे धुताना आणि आंघोळ करताना निदर्शनास आले आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत आश्रम शाळेचे अधीक्षक किंवा शिक्षक उपस्थित नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आता या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की, शासनाकडून विद्यार्थ्यांकरीता दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो आहे तरी मात्र विद्यार्थ्यांना शाळेत आंघोळीची आणि कपडे धुण्याची व्यवस्था नाही का ? जर असेल तर मग विद्यार्थी आपले जीव धोक्यात घालून विहिरीपर्यंत जातात आणि शाळा प्रशासनाचे विद्यार्थ्यांकडे लक्ष का नाही असे अनेक प्रश्न राणीगाव येथील विद्यार्थ्यांना बघितल्यानंतर उपस्थित झाले आहे. प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्याकडून गाणी गाव आश्रम शाळा प्रशासनाला जाब विचारून प्रकरणाची चौकशी करून दोषी ठरणाऱ्या शाळा प्रशासनाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची सक्त गरज आहे.
________________________________
मी उत्तर पत्रिका आणण्याकरिता अमरावतीला गेलो होतो. विद्यार्थी शाळेबाहेर जात असतील तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधीक्षक यांची असते. अधीक्षकांनी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे अपेक्षित असते व विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी अधीक्षकांवर असते.
-साबळे (मुख्याध्यापक राणीगाव आश्रम शाळा)
________________________________
मी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन चौकशी करणार, सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या शाळा प्रशासनाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार.
-प्रियंवदा म्हाडदळकर (प्रकल्प अधिकारी धारणी)
