जळगाव जा. मतदार संघात लढतीचे चित्र स्पष्ट !प्रशांत डिक्कर यांची आ. कुटे यांचे सोबत लढत...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
जळगाव जामोद- विधानसभा मतदार संघातील लढतीचे चित्र हळूहळू स्पष्ट होत असून परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांची महायुतीचे आ.डॉ. कुटे यांच्यासोबत लढत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. प्रशांत डिक्कर यांनी प्रस्थापितांच्या विरोधात प्रचारात मारलेली मुसंडी व त्यांना बहुसंख्य सर्वसामान्य मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता एकंदरीत त्यांची विजयाकडे घौडदौड सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.राजे छत्रपती संभाजी यांनी प्रशांत डिक्कर यांच्या विजयाचा विडा उचलला आहे. त्यासाठी राजेंनी जळगाव जामोद येथील सभा गाजविल्यानंतर परत 15 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद ते शेगाव महारॅलीला उपस्थित राहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. तर प्रशांत डिक्कर मतदार संघातील गावनगाव पिंजून काढत आहेत. प्रचार दरम्यान महिला भगिणींकडून त्यांचे औक्षण करून विजयाचा आशिर्वाद देण्यात येत आहे. तर सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी जिवाचे रान करीत आहेत. सोबतच सर्वसामान्य, शेतकरी, शेतमजूर, युवा वर्गाचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने त्यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे निवडणूक निधी म्हणून त्यांना सर्व स्तरातून देणगी मिळत असल्याने प्रशांत डिक्कर हे मतदारांच्या पसंतीला उतरले असल्याचे दिसून येत आहेत.
