क्रेनचा लोखंडी टप डोक्यावर पडून ३९ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू... संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील घटना...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
बुलढाणा जिल्ह्यात येणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे दिनांक २४ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास विहिरी मधून क्रेनच्या सहाय्याने माती काढत असताना अचानक लोखंडी टपचा वायर रोप तुटल्याने टप डोक्यावर पडून ३९ वर्षीय इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.. पळशी झाशी येथील विनोद मनोहर सावदेकर वय ३९ वर्ष हे गावातील हरिदास तोताराम बांगर यांच्या शेतामध्ये विहिरीचे खोदकाम करण्याकरिता मजुरीने गेले होते. तेथे विहिरी मधून लोखंडी टप मातीने भरून क्रेनच्या साहाय्याने विहिरी बाहेर टाकत असताना अचानक क्रेनचा मध्येच वायरोप तुटल्याने मातीने भरलेला लोखंडी टप हा मृतक विनोद सावदेकर यांच्या डोक्यावर पडला. त्यामुळे घटनास्थळीच विनोद सावदेकर यांचा मृत्यू झाला. विहिरीमध्ये तीन मजूर काम करीत होते काम करीत असताना ही घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद मुळे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली व पंचनामा करीत मृतकाचे शरीर शव विच्छेदनासाठी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले.शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचे पश्चात आई वडील पत्नी,एक मुलगा एक मुलगी, दोन भाऊ, दोन बहिणी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. सदर घटनेचा पुढील तपास तामगाव पोलीस स्टेशन ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद मुळे हे करीत आहेत.
