नाट्यकृतीतून सामाजिक व्यथा वेदना अधोरेखित व्हाव्यात- ॲड. रोठे...अक्षरदेह आयोजित नाटकामागील नाटक उपक्रमाला कलावंतांचा प्रतिसाद...


नाट्यकृतीतून सामाजिक व्यथा वेदना अधोरेखित व्हाव्यात- ॲड. रोठे...अक्षरदेह आयोजित नाटकामागील नाटक उपक्रमाला कलावंतांचा प्रतिसाद...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी.... 

कलेच्या माध्यमातून मनोरंजनासोबत प्रबोधनसुध्दा अपेक्षित असते. नाट्य कलेतून समाजातीलच पात्रे रंगमंचावर जीवंत होतात. त्यामुळे प्रामुख्याने समाजातील व्यथा वेदना नाट्यकृतीतून प्रतिबिंबित व्हाव्यात, असे मत आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सतीशचंद्र रोठे यांनी येथे व्यक्त केले.नववर्षाच्या निमित्ताने अक्षरदेह नाट्यकला व बहुउद्देशीय संस्थेतर्फे २ जानेवारी रोजी  स्थानिक इंटक संघटनेच्या सभागृहात "नाटकामागील नाटक" हा नाट्य प्रवासाच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सतीशचंद्र रोठे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाट्यकर्मी अभियंता गणेश बंगाळे हे होते. जेष्ठ नाट्यकर्मी योगेश बांगडभट्टी, जयंत दलाल, दिनेश उचाडे, कवी अमरचंद कोठारी , नाट्य कलावंत रंजना बोरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.नटराज पूजन करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी नाट्यक्षेत्रातील सेवेबद्दल योगेश बांगडभट्टी यांचा गणेश बंगाळे यांच्याहस्ते तर साहित्य क्षेत्रातील सेवेबद्दल अमरचंद कोठारी यांचा विनय शुक्ल यांच्याहस्ते स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी रंजना बोरीकर यांनी नाट्यक्षेत्रात महिला कलावंतांचा टक्का वाढावा यासाठी सर्वांनी आचार विचार सुयोग्य ठेवून महिलांना सुरक्षित व समाधान वाटेल अशा वातावरणाची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. विनय शुक्ल यांनी रंगगंध कलासक्त न्यासतर्फे चिखली येथे घेण्यात येणाऱ्या नाट्य वाचन स्पर्धेची माहिती दिली. यानंतर योगेश बांगडभट्टी, जयंत दलाल, सिने अभिनेते ॲड. गणेश देशमुख, दिनेश उचाडे पाटील, डॉ. स्वप्नील दांदडे यांनी नाटकामागील नाटक कसे घडते याविषयीच्या अनेक गंमतीशीर घटना घडामोडी साभिनय कथन करुन रंगत आणली. अध्यक्षीय भाषणातून अभियंता गणेश बंगाळे यांनी रंगमंचावर नाटक सादर होत असतांना रंगमंचाच्या मागेसुध्दा एक समांतर नाटक सुरु असते. प्रेक्षकांना ते दिसत नसले तरी त्या पडद्यामागील कलावंतांमुळे रंगमंचावरचे नाटक देखणे होत असते असे सांगून त्यांचे नाट्यानुभव कथन केले. कार्यक्रमाच्या शेवटी कवी अमरचंद कोठारी यांनी त्यांची सुप्रसिद्ध 'पेड' ही कविता सादर करुन उपस्थितांना अंतर्मुख केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षरदेह संस्थचे अध्यक्ष शशिकांत इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन सचिव संतोष पाटील यांनी केले तर कोषाध्यक्ष विलास मानवतकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अण्णासाहेब जाधव, पंजाबराव आखाडे, पराग काचकुरे, अर्चना जाधव, प्रतिक शेजोळ, कल्याणी काळे, भक्ती लहाने, धनंजय बोरकर, श्वेता आराख, निकिता मोरे, पवन बाबरेकर, संदिप तायडे, सांची इंगळे, सृजन इंगळे, क्रिष्णा बोरीकर यांच्यासह कलावंत व रसिक उपस्थित होते.

Previous Post Next Post