राष्ट्रपतींसमोर अधिकाऱ्यांची पोलखोल अन् 40 गावांत वीज दाखल...


राष्ट्रपतींसमोर अधिकाऱ्यांची पोलखोल अन् 40 गावांत वीज दाखल...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि परिसरातील चाळीस गावांत स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही वीज आलेली नव्हती. अधिकाऱ्यांची सतत नकारघंटा ठरलेलीच. अशावेळी मी गावची सरपंच झाले. त्यानंतर एकदा राष्ट्रीपतींसमोर बोलण्याची संधी मिळाली. आपल्या भागांतील समस्या मी धाडसाने मांडली अन् अवघे प्रशासन कामाला लागले. चाळीस गावांत वीज आली. डायरी लिहिण्याच्या सवयीमुळे मला हा फायदा झाला..!हे उद्गार आहेत अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा (मेळघाट) भागातील काटकूंभ गावच्या सरपंच ललिता आसराम बेठेकर यांचे. त्या सध्या पुणे शहरातील 'यशदा'मध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या आहेत. आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या ललिता यांची मातृभाषा कोरकू. आजूबाजूच्या चाळीस गावांत वीज, रस्ते आणि पाण्याची समस्या पाचवीला पुजलेली.दहावी, बारावी, पदवीधर झाल्यावर त्यांनी एम. ए. पर्यंतचे शिक्षण अमरावतीच्या संत गाडेबाबा विद्यापीठातून अतिशय खडतर प्रवासातून घेतले. आपल्यातील एक महिला इतकी शिकली म्हणून गावकऱ्यांनी त्यांना सरपंच म्हणून निवडून दिले.ललिता 2022 मध्ये सरपंच झाल्या. त्या वेळी गावासह परिसरातील चाळीस गावांत विकासकामांचा पत्ताच नव्हता. घरात, रस्त्यांवर वीज नाही, रस्ते नाहीत. अशावेळी त्यांना पुण्यातील 'यशदा'मध्ये प्रशिक्षणाची संथी मिळाली आणि त्यांचे जीवनच बदलून गेले.डायरी लिहिण्याची सवय कामी आली... 'यशदा'मध्ये ललिता बेठेकर प्रशिक्षणासाठी तिसऱ्यांदा आल्या. त्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि त्यांची आदिवासी भाषा कोरकू उत्तम बोलतात. त्यामुळे 'यशदा'तील प्रशिक्षणात त्यांचे वेगळेपण दिसले. प्रशिक्षक स्नेहा देव यांनी ललिता यांची डायरी लिहिण्याची पद्धत पाहिली आणि त्या भारावून गेल्या. किती गावांत वीज नाही, किती गावांत रस्ते नाहीत, किती गावांना पाणी नाही, याचा लेखाजोखा डायरीत मांडून ठेवला होता.

•राष्ट्रपती महोदया, माझी समस्या ऐका

-... ललिता यांना 5 ते 7 जानेवारी 2025 या कालावधीत सर्व प्रशिक्षित महिला सरपंचांसमवेत राष्ट्रपती द्रौपर्टी मुर्मू यांना भेटण्याची संधी मिळाली. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात राष्ट्रपतींना गाठून त्यांनी आवाज दिला. राष्ट्रपती महोदया, माझी समस्या ऐका... मी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातून आली आहे. मेळघाटातील चाळीस गावे अजूनही अंधारात कशी आहेत, ही कहाणीच विशद केली.तेव्हा दिल्ली ते गल्ली प्रशासन गतिमान झाले. अधिकाऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली आणि त्या चाळीस गावांमध्ये सौरदिवे अवघ्या दोन ते तीन महिन्यांत आले, पंचाहत्तर वर्षे अंधारात असलेली गावे वीज आल्याने लखलखली.चिखलदार, जि. अमरावती आमच्या परिसरातील सरकारी अधिकारी, कर्मचारी वीजयंत्रणा उभारू देत नव्हते. दरवेळी खोटी कारणे सांगून विषय टाळला जात असे. शेवटी राष्ट्रपतींसमोर मला बोलण्याची संधी मिळाली. मी मेळघाटातील चाळीस गावे अजून आंधारात आहेत, हे सांगितले. तेव्हा प्रशासन खडबडून जागे झाले. गावातील रस्त्यांवर सौरदिवे आले, खूप आनंद झाला. पण, अजूनही घरात वीज येणे बाकी आहे. त्यासाठी आमचा लढा सुरू आहे. परिसरात महावितरण कंपनीने 33 केव्हीचे उपकेंद्र बांधले. मात्र, ते व्याघ्र प्रकल्पाजवळ का बांथले म्हणून अडचणीत आले, म्हणून अजूनही बंदच आहे. त्यासाठी देखील आमचा लढा सुरू आहे.

स्नेहा देव, सहा. प्राध्यापक तथा निवृत्त प्रशासकीय अधिकारी, यशदा, पुणे..

राष्ट्रपतींना भेटताच महिला सरपंचांना खूप आनंद झाला. त्यांच्यासह आमच्यासाठीही ती आठवण रोमांचक आहे. ललिता डायरी लिहिते ती ग्रामपंचायतीच्या विकासकामांची आदर्श रोजनिशी आहे. राष्ट्रपतींना भेटून आलेल्या काही महिला सरपंच आता आमच्या मास्टर ट्रेनर झाल्या आहेत. त्यातील ललिता एक आहे. मला या मुलींचा अभिमान वाटतो.

Previous Post Next Post