राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
चिखलदरा मेळघाटातील आदिवासी बांधवांची होळी नुकतीच साजरी झाली. आदिवासी बांधवांचा होळी उत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव असतो. या उत्सवाच्च्या अनुषंगाने जिल्हापरिषद अमरावती जिल्हाधिकारी अमरावती तसेच आदिवासी विकास विभाग धारणी यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा येथे मेळघाट रंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या रंग उत्सवाला मेळघाटातील आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासनाच्या विविध विभागामार्फत या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते. ५० ते ६० स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमार्फत आदिवासी बांधवांना विविध विभागामार्फत योजनांची माहिती देण्यात आली, तसेच ऑनलाईन कामेसुद्धा करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मेळघाटचे आ. केवलराम काळे यांच्याहस्ते करण्यात आले.याप्रसंगी जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा तसेच प्रियंवदा महादळकर सह. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धारणी, मेळघाटचे आ. केवलराम काळे, तहसीलदार जीवन मोरणकर, चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, यशवंत बहाडे विभागीय वनाधिकारी, लोहकरे मुख्याधिकारी चिखलदरा, हिरुजीहेकडे, उपेन बचले, प्रमोद शनवारे, शैलेश महाला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद संजिता मोहपात्रा यांनी आदिवासी बांधवांशी आदिवासी बोली भाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला.डाईचो मायचो सभी को राम राम' या शब्दाने संजिता मोहपात्रा यांनी सुरुवात केली. मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी आदिवासी बोली भाषेत संवाद साधणे म्हणजेच आपुलकीच्या भावनेतून संवाद साधल्याने आदिवासी बांधवांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला होता.
--------------------------------------------------
मेळघाटातील आदिवासी बांधवांचा होळी उत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव आहे. हा उत्सव यावर्षी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात आला. हा अतिशय चांगला उपक्रम आहेय् या माध्यमातून आदिवासी बांधवांनासुद्धा शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे आणि तुला आदिवासी बांधवांनी घ्यावा.
-केवलराम काळे, आमदार, मेळघाट
या ठिकाणी बचतगट यांच्यामार्फत वीस, पंचवीस टोल लावण्यात आले होते. या स्टॉलवर मेळघाटात तयार होणारे ज्वारीच्या भाकरी, मक्याच्या भाकरी, कुटकीचा भात, कोदोचा भात, विविध प्रकारच्या चटण्या, मोहापासून तयार केलेले खाद्य शरबत, रानभाज्या तसेच रानमेवा या ठिकाणी स्टॉलवर लावण्यात आले होते. या सगळ्या खाद्याची चव अधिकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी चाखली.
