वडगाव गड येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचा यशस्वी समारोप...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
वडगाव गड येथे दिनांक ७ मार्च पासून सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. सलीम पटेल साहेब, सहसचिव श्री. रब्बानी देशमुख, उपाध्यक्ष प्रा. कय्युम पटेल, संचालक सिराजोद्दीन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव गड येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विशेष शिबिराचा समारोप दिनांक १३ मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या शिबिरादरम्यान स्वच्छता अभियान, सामाजिक जागरूकता कार्यक्रम, निसर्ग संरक्षण उपक्रम आणि विविध कार्यशाळा राबविण्यात आल्या. स्वयंसेवकांनी गावकऱ्यांसोबत संवाद साधून समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.शिबिराच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शेख फराह होत्या..रब्बानी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर प्रमुख पाहुणे म्हणून रेंज फॉरेस्ट ऑफिसर निलेशजी काळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सचिन वारूळकर हे उपस्थित होते. स्वयंसेवकांनी आपले शिबिरातील अनुभव सांगितले आणि शिबिरातून मिळालेल्या शिकवणीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. काही स्वयंसेवकांनी शिबिरादरम्यान गावात केलेल्या कार्याचा अनुभव व्यक्त करत, समाजसेवा आणि टीमवर्क कसे महत्त्वाचे आहेत, हे अधोरेखित केले.निलेश काळे यांनी वनसंवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि जंगलतोडीमुळे होणाऱ्या हानीबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबून निसर्ग रक्षणाचा संदेश दिला. सचिन वारूळकार यांनी युवकांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करून देशसेवेसाठी कार्य करावे असे सांगितले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून मिळणाऱ्या अनुभवांचा व्यक्तिमत्व विकास आणि नेतृत्व कौशल्यांसाठी उपयोग होतो असे त्यांनी स्पष्ट केले. रब्बानीजी देशमुख यांनी एन.एस.एस.च्या स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी आणि समाजासाठी कार्य करावे असे सांगून सेवा वृत्तीचे महत्त्व पटवून दिले
डॉ. शेख फराह यांनी स्वयंसेवकांनी शिबिरात घेतलेल्या अनुभवांवर भाष्य करत, समाजसेवा, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोहर जांभळे यांनी केले तर महिला कार्यक्रम अधिकारी प्राजक्ता बाठे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी कचऱ्याचे दहन करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यावेळी स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त परिसर आणि स्वच्छ भारत अभियानासाठी कार्य करण्याची शपथ घेतली.या विशेष शिबिरातून स्वयंसेवकांना स्वच्छता, समाजसेवा, निसर्ग संवर्धन, शिस्त, नेतृत्वगुण आणि सामूहिक जबाबदारी यांचे महत्त्व शिकता आले. या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्येही सामाजिक भान आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण झाली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोहर जांभळे, डॉ. निखिल अग्रवाल, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. प्राजक्ता बाठे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व शिबिरार्थी यांनी परिश्रम घेतले.
