आदिवासी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करा..शेकडो आदिवासी बांधव जळगाव पोलिस स्टेशनवर दिले निवेदन...
जळगाव जामोद प्रतिनिधी :-
कहुपट्टा शेत शिवारामधील २१ एक्कर शेतीच्या वादातून आदिवासी कुटुंबावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक २५ मार्च रोजी शेकडो आदिवासी बांधवांनी एकत्र येवून जळगाव जा.पोलीस स्टेशन, तहसीलवर मोर्चा काढला.सातपुडा पायथ्याशी असलेल्या व सुनगांव ग्रामपंचायत हद्दीतील कहुपट्टा शेत शिवारात भुवानसिंग मुजालदा यांच्या परिवारावर शेती वादातून जळगाव जा शहरातील मोहम्मद शब्बीर आणि त्याच्या मुलगा मोहम्मद रिजवान यांनी दिनांक २३ मार्च २०२५ रोजी प्राण घातक हल्ला केला होता. ह्या हल्ल्यात भुवानसिंग मुजालदा यांचेसह तीन जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. एवढा गंभीर प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा जळगाव पोलिसांनी आरोपींना अद्याप पर्यंत अटक केली नसून आरोपी मोकाट फिरत आहेत.त्यामुळे आरोपींवर नवीन भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम १०९ आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी सातपुडा पायथ्याशी असलेल्या आदिवासी बांधवांनी दिनांक २५ मार्च रोजी जळगाव पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी आरोपींना ४८ तासाच्या आत अटक न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे सुकलाल महारसिंग चंगड, प्रल्हाद रायसिंग चंगळ, दीपक तेरसिंग राऊत यांचे सह शेकडो आदिवासी बांधवांच्या वतीने देण्यात आला.
