उपातखेडा गार्डन व पर्यावरणाची ऐसी तैसी...३.५ कोटींचा शासकीय निधी वाया; संबंधित विभागांचे संपूर्ण दुर्लक्ष...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी
चिखलदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या उपतखेडा येथील गार्डन आणि पर्यावरण प्रकल्पाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शासनाने ३.५ कोटी रुपये खर्चुन उभारलेला हा गार्डन प्रकल्प सध्या निष्क्रिय स्थितीत असून, त्याचा उपयोग शून्यावर आला आहे. सामाजिक वनीकरण विभाग अचलपूर, वनपरिक्षेत्र विभाग परतवाडा आणि स्थानिक वनसमिती यांनी या प्रकल्पाकडे संपूर्ण दुर्लक्ष के ल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनेचे अध्यक्ष योगेश खानजोडे आणि त्यांच्या सहकारी सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती यांनी उपातखेडा गार्डनला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा प्रकल्प आदिवासी पर्यटन व पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचा होता. मात्र आज येथे न फुलं आहेत, न देखभाल. पाण्याची सोय नाही, तिथे तांत्रिक उपकरणं गंजत पडली आहेत आणि गार्डन जंगलात रुपांतरित झालं आहे.त्यांनी यावेळी शासन आणि वनविभागावर कठोर शब्दांत टीका करत सांगितले की, हे एक आर्थिक अपव्ययाचं जिवंत उदाहरण आहे. ३.५ कोटी रुपये खर्चुन जर सामान्य पर्यटकांना किंवा स्थानिक नागरिकांना काहीच मिळत नसेल, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.प्रकल्पाचे सुरुवातीचे उद्दिष्टः उपातखेडा गार्डनची निर्मिती पर्यटन वाढविणे, पर्यावरण संरक्षण करणे, स्थानिक आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात प्रकल्प सुरू होऊन काही महिने उलटल्यानंतरच त्याकडे दुर्लक्ष झाले.
स्थानिकांची मागणीः-
स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी यांनी यापूर्वी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी व मौखिक तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आता आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटना या विषयाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि वनमंत्री यांच्याकडे थेट निवेदन देणार असल्याचे खानजोडे व पदाधिकारी यांनी सांगितले.
निष्कर्षः- सरकारने आणि प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन उपतखेडा गार्डनचा पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला नाही, तर येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.