असिस्टंट मॅनेजरला लुटणाऱ्या 2 आरोपींना केली अटक... 2.43 लाखांचा मुद्देमाल जप्त; परतवाडा येथील घटना...
न्युज RC24 महाराष्ट्रासाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजु भास्करे..
परतवाडा येथील भारत फायनान्स इन्क्लूजन लिमिटेड या वित्तसंस्थेच्या असिस्टंट मॅनेजरकडून 2.08 लाख रुपये लुटल्याप्रकरणी ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन लुटारूंना अटक केली आहे. लुकेश नुतनराव दोड (25, रा. योगीराज कॉलनी) आणि विपुल गोविंदराव जवंजाळ (30, रा. धनेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून रोख रक्कम, मोबाइल आणि गुन्हा करताना वापरलेली दुचाकी अशा एकूण 2.43 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सत्यम रविदास सोनवणे (20) हे भारत फायनान्समध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. 21 मे रोजी ते आपल्या मित्र साहिल कदमसोबत आरेगाव व खांजमनगर येथे महिलांच्या बचत गटांची बैठक घेऊन 2 लाख 8 हजार 860 रुपये वसूल करून परत परतवाड्याकडे निघाले होते. परसापूर येथील एकलव्य स्कूल जवळ दोघा अज्ञात दुचाकीस्वारांनी यांना थांबवले. पेन मागण्याच्या बहाण्याने त्यांची दुचाकीची चावी काढून घेतली व पैशांनी भरलेली बॅग हिसकावून पळ काढला. या प्रकरणाची तक्रार पथ्रोट पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या घटनेच्या समांतर तपासासाठी ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाची स्थापना करण्यात आली होती. पोलिस उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या नेतृत्वाखालील टीमने तांत्रिक पुरावे व गुप्त माहितीच्या आधारे अमरावतीतील योगीराज कॉलनीतील लुकेश आणि विपुल या दोघांना ताब्यात घेतले.सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 43 हजार रुपये रोख, 3 मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 2.43 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नितीन इंगोले, पोलिस हवालदार सुनील महात्मे, सय्यद अजमत, सुधीर बावणे, निलेश डांगोरे, चेतन दुबे, हर्षद घुसे, सागर धापड, शिवा शिरसाड, रितेश गोस्वामी, विकास अंजीकर यांनी केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी पथ्रोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.