संग्रामपूरातील सीआरपीएफ जवान मुलाचे लग्न अर्ध्यावर सोडून सीमेवर रवाना ! जवान पुन्हा कर्तव्यपथावर तैनात...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
पहलगाम हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशभरातील सर्व सुरक्षा दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जवानांना सीमेवर तातडीने तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील जवान गजानन वामनराव डाखोडे यांचाही समावेश होता. 27 तारीख पर्यंत सुट्टी घेऊन मुलाच्या लग्नासाठी घरी आलेल्या जवानाचे सुट्टी रद्द झाल्यामुळे अर्ध्यावरच लग्न सोडून 12 मे ला जवान तातडीने सीमेकडे रवाना झाले.संग्रामपूर येथील जवान गजानन वामनराव डाखोडे हे सीआरपीएफमध्ये कार्यरत आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर त्यांना सीमेवर हजर राहण्याचे आदेश मिळाले. त्यांनी तातडीने सीमेवर राहण्याची तयारी दर्शवली.गजानन डाखोडे या सुट्टीवर आपल्या घरी, आपल्या मुलाच्या लग्नासाठी आले होते. मात्र, देशसेवेचे व्रत जपण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाचे लग्न अर्ध्यावर सोडून सीमेवर रवाना व्हावं लागलं.या वेळी जवानांचे कुटुंबीय भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.सिआरपीएफ च्या डेल्टा कंपनी 238 बटालियन मध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेले बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील गजानन वामनराव डाखोडे यांना त्यांच्या मुलाच्या ऐन लग्नाच्या दिवशी कंपनी कमांडर चा कॉल करून भारत-पाकिस्तान तणावाचे पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर करीता निर्धारित सुट्टीचा कालावधी रद्द करुन देशसेवेसाठी परत येण्याचा आदेश आहे. उर्वरित लग्नकार्य व इतर समारंभ सोडून लग्नाचे पाहुणे, आप्तस्वकीय व गावकऱ्यांनी त्यांना निरोप देत " यशस्वी होऊन परत या " अशा शुभेच्छा दिल्या. निरोपाचा हा प्रसंग भावूक होता.भारतमातेच्या या जवानाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नातेवाईक व नागरिकांनी गर्दी केली होती. भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद, अशा घोषणा देत त्यांना रवाना केले . यावेळी स्थानिक तामगाव पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक बोपटे ,गजानन डाखोडे व परिवारातील सदस्य व नातलग मित्र परिवार मार्गस्थ करण्यासाठी आले होते.त्यावेळी शेगाव रेल्वे स्थानकावर भारत माता की जय, जय जवान जय किसान च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता.