पत्रकार कुटुंबांसाठी दिलासादायक निर्णय — वैद्यकीय खर्चात ५०% सवलतीचा लाभ मिळणार!पत्रकारांना दिलासा : वैद्यकीय खर्चात ५०% सवलतीचा ऐतिहासिक निर्णय...!
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. सचिन महाराज माथेफोड यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, डॉक्टर वेलफेअर असोसिएशन, उरुळी कांचन यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.या निर्णयानुसार पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना — म्हणजे आई-वडील, पत्नी व मुले यांना वैद्यकीय उपचारांमध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. हा लाभ १५० हून अधिक रुग्णालयांमध्ये मिळणार असून, ही योजना लवकरच अंमलात येणार आहे.सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून डॉक्टर वेलफेअर असोसिएशनने हा निर्णय घेतला असून, पत्रकारांच्या सेवेला दिलेल्या मान्यतेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. प्रा. माथेफोड यांच्या पुढाकाराने हे काम शक्य झाले आहे. या निर्णयामुळे अनेक पत्रकार कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.पत्रकार हे समाजाचे चौथे स्तंभ असून, अनेकदा ते स्वतःच्या आरोग्यापेक्षा कर्तव्यास प्राधान्य देतात. अशा वेळी त्यांच्यासाठी ही योजना आश्वासक ठरणार आहे. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर जिल्ह्यांमध्येही अशी योजना राबवण्याची मागणी होऊ लागली आहे.रविवारी झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ गणेश आखाडे,उपाध्यक्ष डॉ प्रशांत शितोळे, डॉ उमा कथले, डॉ शरद गोते, डॉ परिमल परदेशी, डॉ समीर ननावरे, डॉ विजय फडतरे, डॉ सुनील गांगुर्डे यांच्या हस्ते सवलतीचे पत्र उपस्थित पत्रकार राज्य मराठी पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन सुंबे,राज्य उपाध्यक्ष नितीन करडे,भाऊसाहेब महाडिक,सहदेव खंडागळे,सुनील तुपे,चंद्रकांत दुंडे यांना देण्यात आले.
_________________________________________
प्रा.सचिन महाराज माथेफोड
(पुणे जिल्हा अध्यक्ष राज्य मराठी पत्रकार परिषद)
लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणारा पत्रकार तसेच समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करणारा पत्रकार आर्थिक बाबतीत नेहमीच मागे पहायला मिळतो.समाजाच्या हक्काचा झालेला तो कुटुंबियांच्या जबाबदाऱ्यांच्या बाबतीत मात्र नेहमीच अपुरा पडत असतो.त्यात स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी वैद्यकीय गरज पडली तर नेहमी इतरांच्या उपयोगी पडणाऱ्या पत्रकारांना मात्र हाती निराशाच येते.म्हणून त्याची गैरसोय होऊ नये म्हणून व अशावेळी कोणाच्याही हातापाया त्याला पडायला लागू नये म्हणून हा उपक्रम राबविणे खूप गरजेचे होते.१५० हून अधिक हॉस्पिटल्स असणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून निश्चितच प्रत्येक पत्रकाराला व त्याच्या कुटुंबियांना योग्य व सवलतीच्या दरात उपचार मिळतील आता त्यासाठी त्याला कोणाचेही पाय धरण्याची आवश्यकता नाही.यासाठी राज्य उपाध्यक्ष नितीन करडे,विजय लोखंडे तसेच केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.त्याचसोबत पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशन व वाघोली डॉक्टर असोसिएशन या संघटनांशी देखील बोलणे झालेले असून थोड्याच दिवसात त्यांच्याकडे देखील ही योजना अमलात येईल.ही योजना पत्रकार बांधवांसाठी एक मोठा आधार ठरेल, हे निश्चित!